दोन वर्षांपासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत
By admin | Published: October 4, 2016 12:34 AM2016-10-04T00:34:31+5:302016-10-04T00:34:31+5:30
पालांदूर परिसरात तीन वर्षापासून ओला, कोरडा दुष्काळ पडत आहे.
शेतकऱ्याने मांडली व्यथा : विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेचा प्रताप
पालांदूर : पालांदूर परिसरात तीन वर्षापासून ओला, कोरडा दुष्काळ पडत आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळाला. मात्र विदर्भ कोंकण ग्रामीण बँक शाखा पालांदूरने लाभार्थ्यांना पिकविमा दिलाच नसल्याचा आरोप नत्थू खंडाईत यांनी पत्रपरिषदेत केला.
यावेळी खंडाईत यांनी, वारंवार क्षेत्रीय व्यवस्थापक विदर्भ कोंकण ग्रामीण बँक कारापुरकर भंडारा यांच्याशी भेटून आश्वासनापलिकडे काहीही हातात लागले नसल्याचे सांगितले. चालू खरीप अनियमित पावसाने प्रभावित झाला असून हलक्या धानाचा हंगाम संकटात आला आहे. तरीही शासन - प्रशासन नगरजअंदाज आणेवारी ७२ पैेसे दाखवितो आहे. वास्तविकतेकडे लक्ष न देता प्रक्रियेतून दुष्काळ मोजण्याची रित बंद करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
खरीप हंगामात पंतप्रधानांच्या हाकेला साथ देत पंतप्रधान पीक विमा काढलेला आहे. निसर्गाच्या दुष्टचक्रात धान काही ठिकाणी जमीनदोस्त तर काही ठिकाणी लोंबीलाच अंकुर आले आहेत. तुळतुडा, करपा, अळीने पिक बेजार आहे. प्रत्येक पंचनाम्याकरिता विमा कंपनीचे प्रतिनिधी पोहचलेच नसल्याने नुकसान कळणार नाही. त्यामुळे विम्याचे संरक्षण दुर्लभ होणार हे निश्चित दिसते. अशावेळी शेतकऱ्यांनी कुणाकडे दाद मागावी हे अनुत्तरीत आहे. कृषी विभागही डोळेझाक करताना दिसते. पिकविमा काढण्याकरिता घसा कोरडा होईपर्यंत सांगतात मग पंचनाम्याकरिता पुढाकार का नाही? असा संतप्त प्रश्न त्यांनी यावेळी केला. (वार्ताहर)