सात दशकानंतरही डांबरीकरणाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 10:00 PM2018-05-06T22:00:42+5:302018-05-06T22:00:42+5:30
गाव तिथे रस्ता व रस्ते हे विकासाचे प्रमुख केंद्रबिंदू मानले जाते. रस्ते तयार करण्याचा दावा शासनाकडून केला जातो. परंतु तुमसर तालुक्यातील सिलेगाव - कर्कापूर - परसवाडा रस्ता पंधरा वर्षापूर्वी खडीकरण केला होता.
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : गाव तिथे रस्ता व रस्ते हे विकासाचे प्रमुख केंद्रबिंदू मानले जाते. रस्ते तयार करण्याचा दावा शासनाकडून केला जातो. परंतु तुमसर तालुक्यातील सिलेगाव - कर्कापूर - परसवाडा रस्ता पंधरा वर्षापूर्वी खडीकरण केला होता. सध्या रस्त्यावर खडीकरणाचे दगड बाहेर आले आहेत. दुसरा सिहोरा - सिलेगाव - वाहनी - परसवाडा रस्त्याचे डांबरीकरण उखडले आहे. वाहनधारकांना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत आहे.
स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही डांबरीकरणाचा पक्का रस्ता सिलेगाव - कर्कापूर - परसवाडा रस्ता तयार करण्यात आला नाही. १५ वर्षापूर्वी खडीकरण करण्यात आले होते. खडीकरण केलेल्या रस्त्याचे दगड सध्या बाहेर निघाले आहेत. रस्त्याची दूरवस्था झाली आहे. सदर रस्त्यावर एक मोठा नाला पडतो. पावसाळ्यात नाल्यावर पाणी वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटतो. येथे पुन्हा मोठा पुल तयार करण्याची गरज आहे.
सिलेगाव - कर्कापूर रस्त्यावर नागरिकांची ये जा मोठ्या प्रमाणात आहे. सायकल, दुचाकी, ट्रॅक्टर या मार्गाने मार्गक्रमण करतात. दगड बाहेर आल्याने अपघाताची भीती सदैव राहते. पावसाळ्यात रस्ता निमूळता होतो. अनेकदा येथे अपघात झाले आहे. १५ वर्षापूर्वी कच्चा रस्ता तयार करण्यात आला. संबंधित विभागाने मंजुरी दिली. त्यानंतर रस्त्याचा विसर पडला. विकासात्मक कामांची चर्चा करणाऱ्या पदाधिकारी यांचे येथे दुर्लक्ष दिसत आहे.
सिहोरा - सिलेगाव - वाहनी - परसवाडा रस्त्यावर मोठी वाहतूक राहते. तिरोडा - सिहोरा अशी बस या मार्गावर धावते. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. दुचाकी, सायकलस्वार, शाळेतील विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास होत असून अपघाताची शक्यता बळावली आहे.
सिहोरा येथे मुख्य बाजारपेठ असल्यामुळे सदर रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. अनेक महिन्यापासून येथे डांबरीकरणाची मागणी आहे. परंतु संबंधित विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे. डांबरीकरण उखडलेल्या रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रस्त्यावर नेमके डांबर ओतल्याप्रमाणे येथे दिसत आहे. खड्डेमुक्त महाराष्ट्र अशी घोषणा करण्यात आली होती. त्या घोषणेचा येथे विसर पडलेला दिसत आहे.
सिलेगाव - कर्कापूर - परसवाडा रस्त्याचे दगड बाहेर आले असून तो धोकादायक बनला आहे. सिहोरा - सिलेगाव - वाहनी - परसवाडा रस्त्याला डांबरीकरणाची प्रतीक्षा आहे. येथे प्रशासन अपघाताची प्रतीक्षा करीत असल्याचे दिसते. शासन व प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.
-हिरालाल नागपुरे, पं.स. सदस्य, तुमसर.