मामा तलावांना सीमांकनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 09:48 PM2018-01-08T21:48:58+5:302018-01-08T21:50:04+5:30

चंद्रपूर जिल्ह्यात जि.प.च्या लघु सिंचन विभागाकडे १ हजार ६७८ मामा तलाव असून हे सर्व तलाव सीमांकनाच्या प्रतीक्षेत आहेत.

Waiting for the demarcation to mama ponds | मामा तलावांना सीमांकनाची प्रतीक्षा

मामा तलावांना सीमांकनाची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देअतिक्रमण वाढले : शेतकरी व प्रशासनात वाद

घनश्याम नवघडे।
आॅनलाईन लोकमत
नागभीड : चंद्रपूर जिल्ह्यात जि.प.च्या लघु सिंचन विभागाकडे १ हजार ६७८ मामा तलाव असून हे सर्व तलाव सीमांकनाच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी या तलावांवरील अतिक्रमणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सिंचन क्षमता कमी होत आहे.
१६ मे २०१६ च्या जल-१ या निर्णयानुसार या तलावांचे पुनरूज्जीवन करण्याचे शासनाने ठरविले आहे. यानुसार २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात ४१४ तलावांच्या दुरूस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. ऊर्वरित कामे २०१९ पर्यत करण्यात येणार आहेत. असे असले तरी त्याअगोदर या तलावांचे सीमांकन होणे गरजेचे आहे. मात्र या तलावांचे सीमांकन करण्याची तसदी न घेता जि.प.च्या लघु सिंचन विभागाने तलावांचे पुनरूज्जीवन करण्याचे काम सुरू केले. तेच मुळ चुकीचे आहे, असे यासंदर्भात बोलले जात आहे.
वास्तविक, सीमांकनाअभावी या तलावात अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. अतिक्रमणामुळे मामा तलाव काही ठिकाणी आपले अस्तित्व हरवून बसले असून सिंचन क्षमता कमी झाली आहे. या अतिक्रमणामुळे अनेक ठिकाणी अतिक्रमणधारक, गावकरी व प्रशासन यांच्यात संघर्ष उद्भवल्याची उदाहरणे माहित असूनही जि.प या तलावांच्या सीमांकनाबाबत वेळ काढूपणाचे धोरण का अवलंबत आहे, हे एक कोडेच आहे
सीमांकन करून तलावातील अतिक्रमण हटविल्यास पाण्याच्या संचय साठ्यात भर पडून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
प्रशासन व शेतकऱ्यांमधील वादही थांबतील
लघु सिंचान विभागाकडे नसलेल्या पण जि. प. कडील एका विभागाच्या अखत्यारीतील मांगरूड आणि गोविंदपूर येथील तलावाच्या सीमांकनावरून नागभीड तालुक्यातच मोठे वाद उद्भवले होते. मांगरूड येथे तर उपविभागीय पातळीवरील वरिष्ठ अधिकाºयांच्या उपस्थितीत वेस्ट वेअर फोडावा लागल्याची घटना मागील वर्षी घडली होती. हेच सीमांकन अगोदर झाले असते तर ही वेळ आली नसती.
मोजणी शुल्क भरण्यासाठी निधीच नाही
मामा तलावांचे सीमांकन करण्यासाठी उपविभागीय कार्यालयांनी सबंधित भूमी अभिलेख कार्यालयांकडे प्रस्ताव सादर केले आहेत. असे असले तरी भूमी अभिलेख कार्यालय मोजणी शुल्क प्राप्त झाल्याशिवाय सीमांकन करून देत नसल्याने येथेच लघु सिंचाई विभागाचे घोडे अडले आहे. मात्र मोजणी शुल्क अदा करायला लघु सिंचन विभागाकडे निधीच नाही.

तलावाच्या पोटात झालेल्या अतिक्रमणामुळे वारंवार होत असलेले वाद लक्षात घेऊन या सर्व तलावांचे सीमांकन करणे गरजेचे आहे. यावर जि.प.च्या सभेत आपण प्रश्नही उपस्थित केला होता. या तलावांचे सीमांकन करण्यासाठी आपला पाठपुरावा सुरूच राहणार.
- संजय गजपुरे, जि. प. सदस्य, चंद्रपूर .

Web Title: Waiting for the demarcation to mama ponds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.