सात वर्षांपासून "त्या" कुटुंबाची घरकुलाची प्रतीक्षा संपेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2017 12:22 AM2017-05-13T00:22:00+5:302017-05-13T00:22:00+5:30
अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत आहेत. मात्र यातील निवाऱ्याची गरज संपविण्यासाठी प्रशासन लक्ष देत नसेल ....
निराधार, भूमिहीन प्रकाश हलमारेची व्यथा : लोकप्रतीनिधी लक्ष देतील काय?
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत आहेत. मात्र यातील निवाऱ्याची गरज संपविण्यासाठी प्रशासन लक्ष देत नसेल तर लोकप्रतिनिधी त्यासाठी जागरुक राहून न्याय मिळवून देण्याची अपेक्षा असते. परंतु करडी गावात या अपेक्षेलाच मूठमाती दिली जात आहे. सात वर्षापासून प्रकाश हलमारे पडक्या घरात ताडपत्री टाकून झोपडीत वास्तव्य करीत असताना त्यांचे मास्टर यादीत नाव असतानाही घरकूल मिळाले नाही. आता, प्रधानमंत्री आवास योजनेतून प्राधान्य क्रमाने त्यांना लाभ देणे गरजेचे असताना त्यांचेवर प्रशासनाकडून अन्याय केला जात असल्याने न्याय मागायचा तरी कोणाकडे, हा प्रश्न विचारला जात आहे.
करडी येथील प्रकाश यशवंत हलमारे हा अत्यंत गरीबीत जीवन जगत आहे. त्याचेकडे शेती नाही, उदरनिर्वाहाचे साधन नाही. मिळेल ते काम करून कुटूंबाचे भरण पोषण तो करीत आहे. मजुरीचे भरवश्यावर प्रपंच चालवित असताना मातीचे झोपडी वजा घर पावसाने कोसळले. भिंती पडल्या.
त्यामुळे मागील ८ ते १० वर्षापासून तो ताडपत्रीच्या झोपडीत जीवन जगत आहे. मजुरीचे काम करणाऱ्या प्रकाशकडे ५ मुली असून चार मुलीचे लग्न झाले आहे. एक मुलगी पुन्हा लग्नाच्या उंबरठ्यावर आहे. अशा परिस्थितीत घर बांधण्याचे आर्थिक पाठबळ त्यांचेकडे नाही.
तळहातावर रोज जगणाऱ्या प्रकाशला आधार फक्त पत्नीचा आहे. बायकोचे मिठ तर नवऱ्याचा पिठ, अशा अवस्थेत जीवन जगत असताना, सात वर्षाअगोदर त्याचे नाव ग्रामपंचायत मास्टर यादीत होते. गुणांकही कमी होते, परंतू गावातील जास्त गुणांक असलेल्या लाभार्थ्यांना लाभ दिला गेला.
प्रकाशवर राजकीय भावनेतून सुड उगविला गेला. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी राजकीय कार्यकर्त्यांना घराचा लाभ दिला. स्वत:चे घर व गाईचे गोठे बांधण्यासाठी प्रशसनाला हादरवून सोडले. मात्र, प्रकाशला न्याय देण्याचा विचार त्यांच्या मनाला शिवला नाही. अनेकदा ग्रामपंचायतमध्ये प्रश्न लावून धरला असतानाही, घरकुल देण्याचे सौजन्य दाखविण्यात आले नाही. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना दया आली नाही.
स्वत:चे घर नसल्याने त्यांच्या कुटूंबाची वाताहत झाली आहे. पावसाळ्यात जीवन जगावे कसे, असा त्यांचा प्रश्न आहे. घरकुलाच्या प्रतिक्षेत सात वर्ष निघाल्यानतरही प्रधानमंत्री आवास योजनेतून लाभ मिळत नसेल तर आणखी किती दिवस प्रतिक्षा करावी, श्रीमंताना घरकुलाचा लाभ दिला जातो.
मात्र, बेघर व निराधारांना घराचे हक्कापासून वंचित ठेवले जात असेल तर न्याय मागायचा कुणाकडे, निवासा अभावी हलमारे परिवार उघड्यावर जीवन जगत असताना न्याय द्यायचा कुणी, त्यामुळे प्रकाशला घरकुल देण्यासाठी आमदार व खासदार पुढाकार घेणार का, की निव्वळ निवडणुकात गरिबाच्या नावावर मत मागण्याचे राजकारण केले जाणार हा कळीचा मुद्दा आहे.
हलमारे यांना न्याय देण्यासाठी खासदार व आमदार महोदयांनी पुढाकार घ्यावा, घरकूल तत्काळ मंजुर करावा, अशी मागणी प्रकाश हलमारे यांनी केली आहे.
प्रकाश हलमारेवर अन्याय करण्यात आला आहे. ग्रामपंचायत प्रशसानाने त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता. मात्र प्रकाशवर सुड उगविण्यात आला आहे. उघड्यावर जीवन जगणाऱ्यांना घरकुल न देता श्रीमतांना लाभ दिला जात असल्याने त्या विरोधात धरणे आंदोलन केले जाईल. त्वरीत हलमारे यांना घरकुल देणे गरजेचे आहे.
-ज्ञानेश्वर ढेंगे, सामाजिक कार्यकर्ता करडी.
प्रशासनाकडून प्रधानमंत्री आवास योजनेची जी यादी मिळाली होती ती जशीच्या तशी पाठविण्यात आली. गरजुंना विचार करून प्राधान्यक्रम ठरविता येते याची माहिती प्रशासनाने त्यावेळी दिली नाही. त्यामुळे आता काहीही करता येणार नाही.
-सिमा साठवणे, सरपंच करडी.