विद्युत सहायक प्रशिक्षितांना न्यायाची प्रतीक्षा
By Admin | Published: November 23, 2015 12:38 AM2015-11-23T00:38:42+5:302015-11-23T00:38:42+5:30
दहाव्या वर्गाच्या गुणांवर विद्युत सहायक पदाकरिता महावितरण विभागाने निवड केली. परंतु तांत्रिक पदाच्या भरतीकरिता तांत्रिक विषयाच्या गुणाक्रमे निवड व्हावी, ...
तुमसर : दहाव्या वर्गाच्या गुणांवर विद्युत सहायक पदाकरिता महावितरण विभागाने निवड केली. परंतु तांत्रिक पदाच्या भरतीकरिता तांत्रिक विषयाच्या गुणाक्रमे निवड व्हावी, याकरिता थेट उर्जा मंत्र्यापर्यंत निवेदन सोपविण्यात आले. परंतु अजूनपर्यंत कोणताही तोडगा न निघाल्याने तालुक्यातील तांत्रिक बेरोजगार अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.
सन २०१५-१६ या वर्षाकरिता तुमसर येथील विद्युत महावितरण कंपनीने विद्युत सहाय्यक पदाकरिता प्रशिक्षित मुलांकडून अर्ज मागविण्यात आले होते. विद्युत सहाय्यक हे पद तांत्रिक पद असताना महावितरण विभागाने दहावी तसेच आय.टी.आय. उत्तीर्ण गुण विचारात घ्यायला हवे होते. परंतु महावितरण विभागाने तसे न करता केवळ वर्ग १० च्याच गुणांवर आधारित निवड प्रक्रिया उरकवून घेतली. त्यामुळे आय.टी.आय. मध्ये प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना डावलण्यात आल्याने तुमसर तालुक्यातील असंख्य उमेदवारांवर बेरोजगाराची टांगती तलवार लटकली असून त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. सदर निवड भरतीत झालेला अन्याय दूर व्हावा, याकरिता तालुक्यातील बेरोजगार युवकांनी येथील स्थानिक आमदार व खासदारांकडे धाव घेतली होती.
दरम्यान महाराष्ट्राचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता येथील तांत्रिक बेरोजगारांनी उर्जामंत्र्यांना निवेदन सोपवून घटना कथीत केली व संबंधितांना दहावी अधिक आय.टी.आय. चे गुण विचारात घेवून नव्याने निवड प्रक्रिया राबविण्यासंबंधात आदेश निर्गमित करावे, अशीही मागणी केली होती. मात्र अजूनपर्यंत कोणताही तोडगा न निघाल्याने तुमसर तालुक्यातील तांत्रिक बेरोजगारांवर उपासमारीचे संकट ओढावले असून त्यांना न्यायाची प्रतीक्षा आहे. (शहर प्रतिनिधी)