शिस्तभंगाचा अहवाल सादर सीईओंच्या आदेशाची प्रतीक्षा
By admin | Published: June 20, 2017 12:16 AM2017-06-20T00:16:32+5:302017-06-20T00:16:32+5:30
जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे वादळ शमले न शमले तेच आयुक्तांनी या प्रकरणात दोषी पकडून पाच जणांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याच्या हेतूने नोटीस बजावली होती.
प्रकरण आंतरजिल्हा बदलीचे : आयुक्तांनी बजावली पाच कर्मचाऱ्यांना नोटीस
प्रशांत देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे वादळ शमले न शमले तेच आयुक्तांनी या प्रकरणात दोषी पकडून पाच जणांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याच्या हेतूने नोटीस बजावली होती. याप्रकरणी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला. आता केवळ या कर्मचाऱ्यांवर कुठली कार्यवाही होते, त्या आदेशाची प्रतिक्षा सर्वांना लागली आहे. विशेष म्हणजे यात पाचही कर्मचारी दोषी असल्याचे अहवालात नमूद असल्याची बाब समोर आली आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत ११७ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचे प्रकरणात अनियमितता झाल्याने प्रचंड वादग्रस्त ठरले आहे. या बदल्या प्रकरणी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप व नियमभंग करुन बदल्या प्रकरणी आदेश दिल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी ‘लोकमत’ ने सातत्याने वृत्त लिखान करुन प्रकरणाला तडीस नेण्याचा प्रयत्न केला आहे.
या प्रकरणाची दखल घेवून आयुक्त अनुपकुमार यांनी चौकशी समितीच्या माध्यमातून अहवाल मागितला. यात तत्कालीन शिक्षणाधिकारी अभयसिंग परिहार, कक्षाधिकारी नलिनी डोंगरे, अधिक्षक रामभाऊ तरोणे, वरिष्ठ सहायक सुरेश येवले, वरिष्ठ सहायक तथा जि.प. उपाध्यक्ष स्वीय सहाय्यक मनिष वहाणे हे दोषी आढळून आले. याप्रकरणी या पाचही कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाला नोटीस बजावली. याप्रकरणी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल सादर केला असून या अहवालात हे पाचही कर्मचाऱ्यांनी आंतरजिल्हा बदली प्रकरणात नियमभंग केल्याने दोषी आढळून आल्याचे नमूद केल्याची माहिती सुत्रांनी दिली. अहवाल सादर झाला असून यात त्यांच्यावर कारवाच्या अनुषंगाने कुठला आदेश होते. याकडे आता सर्वांचा नजरा लागल्या आहेत.