जागतिक विक्रम नोंदविण्यासाठी 'पुरुषोत्तमची' प्रतीक्षा
By Admin | Published: March 20, 2017 12:18 AM2017-03-20T00:18:01+5:302017-03-20T00:18:01+5:30
उत्तम आरोग्यासाठी, नियमित व्यायाम हे सूत्र नेहमी सांगितले जाते. याचाच अवलंब करुन नियमित व्यायामातून शरीर सुदृढ राखतानाच...
दुर्दम्य इच्छाशक्ती : एका तासात मारतो १, ८८० भारतीय दंड
भंडारा : उत्तम आरोग्यासाठी, नियमित व्यायाम हे सूत्र नेहमी सांगितले जाते. याचाच अवलंब करुन नियमित व्यायामातून शरीर सुदृढ राखतानाच स्वत:चे वेगळेपण सिद्ध करीत जिल्हा आणि देशाचा गौरव वाढविण्याचा प्रयत्न केला जात असेल तर, त्यात वावगे काय? इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि यशस्वी होण्याची तळमळही आहे. परंतू आड येते आहे, ती 'आर्थिक' चणचण! भारतीय दंड (इंडियन पुशअप) मारण्याचा 'रेकॉर्ड' गिनीज बुकमध्ये नोंदविण्यासाठी नोंदणी शुल्क देण्याची क्षमता नसलेला व ६० मिनीटात १८८० दंड मारणारा हा तरुण केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर या स्वप्नाकडे डोळे लावून आहे. आता ही स्वप्नपूर्ती दात्यांच्या हातभारातूनच शक्य म्हणावी लागेल!
भारतीय व्यायाम पद्धती सोपी नाही. प्रचंड मेहनत आणि इच्छाशक्तीतूनच माणूस यात निपून होऊ शकतो. असाच एक विशिष्ट ध्येयाने वेडा झालेला तरुण भंडारा शहरात आहे. व्यायामाने शरीर मजबूत आणि आरोग्य सुदृढ राहते. हे ठिक असले तरी व्यायामातूनच स्वत:चे वेगळेपणही सिद्ध केले जाऊ शकते, हेच या तरुणाने दाखवून दिले आहे. मोहाडी ग्रामीण रुग्णालयात काम करणाऱ्या येथील पुरुषोत्तम चौधरी यांनी वयाची ४५ वर्ष गाठली. परंतू विश्वविक्रम करण्याची जिद्द मात्र अजून सोडली नाही. वयाच्या १४ व्या वर्षांपासून येथील बहिरंगेश्वर व्यायामशाळेत नियमित सरावाला सुरुवात केली. पाच भारतीय दंडकांपासून सुरुवात करणाऱ्या पुरुषोत्तम याने सरावात सातत्य ठेवल्याने शंभर, दोनशे आणि एका तासात १४५० दंडकापर्यंत कधी पोहचला हे कळलेच नाही. सातत्याच्या जोरावरच २०१२ साली त्याच्या या विक्रमाची नोंद लिमका बुकमध्ये झाली. प्रशासनाकडून त्यावेळी त्याचा गौरवही झाला होता. पहिला गढ पार केल्यानंतर गिनीज बुकात आपला विक्रम नोंदविण्यासाठी त्याने धडपड सुरु केली. यात सातत्य आणि प्रचंड मेहनत आहे. मात्र सर्वकाही असताना पैसा हा अडसर ठरीत आहे. जागतिक स्तरावर विक्रम नोंदविण्यासाठी भरावयाचे नोंदणी शुल्कच अवाढव्य आहे. येणाऱ्या मिळकतीतून शुल्क भरणे त्याला शक्य नाही. मात्र प्रयत्न अजूनही सोडलेले नाहीत. २०१२ पासून त्याची ही धडपड सुरु आहे. कुणाचा तरी मदतीचा हात पाठिशी येऊन जिल्ह्यासह देशाचे नाव या अस्सल भारतीय क्रीडा प्रकारात आपल्याला उंचावता येईल, अशी अपेक्षा त्याला आजही आहे.
शासन स्तरावर क्रीडापटूंच्या उत्थानासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. त्यांना सोयीसुविधा मिळाव्या म्हणून निधीही खर्च केला जातो. अशावेळी एका आगळ्यावेगळ्या विक्रमाची नोंद करण्याची क्षमता ठेऊन असलेल्या तरुणाच्या पाठिशी उभे राहण्याची गरज आहे. मदत मिळाल्यास मेहनतीच्या जोरावर हे यश सहज गाठता येईल. (नगर प्रतिनिधी)