सेवानिवृत्तधारकांना प्रवास सवलतीची प्रतीक्षा
By admin | Published: August 21, 2016 12:32 AM2016-08-21T00:32:27+5:302016-08-21T00:32:27+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून सेवा करणाऱ्या व सध्या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या वतीने सेवानिवृत्तीचा लाभ मिळत नाही.
व्यथा रापम कर्मचाऱ्यांची : भंडारा येथील सभेत एल्गार, आज गडकरींच्या वाड्यावर मोर्चा
भंडारा : राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून सेवा करणाऱ्या व सध्या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या वतीने सेवानिवृत्तीचा लाभ मिळत नाही. त्यासोबतच त्यांना बारमाही प्रवास सवलतीपासून वंचित रहावे लागत आहे. सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्रवास सवलत व निवृत्ती वेतन मिळावे अशी मागणी करण्यात आली. यासाठी रविवारला नागपूर येथील नितीन गडकरी यांच्या वाड्यावर मोर्चा काढण्यात येत आहे.
राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने भंडारा येथील मुस्लीम लायब्ररी येथे विभागाीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांना या मागण्यांसाठी एल्गार पुकारण्याचा ठराव घेतला आहे. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय समन्वय समिती अध्यक्ष प्रकाश येंडे, चावके, ठवकर, आर. बी. चौबे, के. ई. कडव, एम. बी. नायडू, एल. एम. रंगारी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या मेळाव्याला सुमारे २०० पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी ईपीएस-९५ (भविष्य निर्वाह निधी) अंतर्गत सेवानिवृत्ती लाभापासून वंचित आहेत. त्यांचा लाभ सर्व कर्मचाऱ्यांना मिळावा, अशी अपेक्षा असतानाही त्यांची बोळवण होत आहे. यासोबतच राज्य परिवहन निवृत्तांना (पती-पत्नी) यांना केवळ दोन महिन्यांचा प्रवास सवलत पास देण्यात येतो. त्यात बदल करून त्यांना बारा महिन्यांचा नि:शुल्क सवलत पास देण्यात यावा, असा ठराव यावेळी करण्यात आला.
यासर्व मागण्यांसाठी व किमान जगण्याइतपत सेवानिवृत्ती द्यावा व भगतसिंग कोशियाची समितीचा अहवाल मंजूर करावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्यावर रविवारला मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या मोर्चात आंतर राज्यीय पदाधिकारी तसेच राज्याचे पदाधिकारी शेकडोंच्या संख्येत उपस्थित राहणार आहे.
प्रास्ताविक व संचालन एल. एम. रंगारी यांनी केले. तर आभार के. ई. कडव यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)