गोरगरीबांना शिवभोजन थाळीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:37 AM2021-05-06T04:37:57+5:302021-05-06T04:37:57+5:30
राज्यात नवीन ३८ शिवभोजन केंद्राला मंजुरी देण्यात आली. त्यापैकी भंडारा जिल्ह्याला १५ केंद्रे देण्यात आली. प्रत्येक केंद्रात शंभर ...
राज्यात नवीन ३८ शिवभोजन केंद्राला मंजुरी देण्यात आली. त्यापैकी भंडारा जिल्ह्याला १५ केंद्रे देण्यात आली. प्रत्येक केंद्रात शंभर थाळ्यांची मान्यता असून, यामुळे जिल्ह्यात पंधराशे अतिरिक्त शिवभोजन थाळ्या उपलब्ध होणार आहेत. परंतु, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे या कोरोनाच्या कठीण प्रसंगात गोरगरीब लोकांना त्यांच्या हक्काच्या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. २६ एप्रिल केंद्र मंजूर होऊनही एकाही नवीन केंद्राला मान्यता देण्यात आलेली नाही. उलट जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना केंद्र सुरू करण्याचे प्रस्ताव अद्याप मागवू नका असा मौखिक आदेश दिल्याची माहिती आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतेही लेखी आदेश नसताना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी नवीन केंद्रांचे प्रस्ताव थांबविले आहेत. या प्रकाराला जिल्हा पुरवठा अधिकारी जबाबदार असल्याचा आराेप राष्ट्रवादीचे जिल्हा महासचिव सुधन्वा चेटुले यांनी केला आहे. केंद्र तत्काळ सुरू झाले नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.