माडगी तीर्थस्थळाला पर्यटन स्थळाची प्रतीक्षा
By Admin | Published: December 25, 2015 01:49 AM2015-12-25T01:49:00+5:302015-12-25T01:50:33+5:30
मिनी पंढरी तथा मिनी कन्याकुमारीची उपमा देवून लौकीक वाढविलेल्या माडगी (तुमसर) देव्हाडा येथे नृसिंह यात्रा महोत्स्व सुरु झाले आहे.
मंदिराच्या पायऱ्या पाण्यात : टेकडीमार्गे मंदिरात करावा लागतो प्रवेश
करडी (पालोरा) : मिनी पंढरी तथा मिनी कन्याकुमारीची उपमा देवून लौकीक वाढविलेल्या माडगी (तुमसर) देव्हाडा येथे नृसिंह यात्रा महोत्स्व सुरु झाले आहे. वैनगंगेच्या नदीपात्रात मध्यभागी २०० फुट शिळेवर लक्ष वेधून घेणारे नृसिंह, विरसिंहाचे जागृत मंदिर आहे. मागील साठ वर्षात या धार्मिक पर्यटन स्थळाची उपेक्षा सुरु आहे. जिल्हा विकास निधीतून आतापर्यंत केवळ सहा लाख रुपयांचा निधी येथे प्राप्त झाला आहे.
अमावस्यापासून पोर्णिमेपर्यंत १५ दिवस माडगी(तुमसर) येथे भगवान नृसिंह, विरसिंह मंदिर परिसरात यात्रा भरते. जागृत मंदिर म्हणून हे मंदिर प्रसिध्द आहे. तुमसर तालुक्यासह भंडारा, गोंदिया जिल्हा व छत्तीसगढ, मध्यप्रदेशातील भाविक येथे मोठ्या संख्येने येतात. दगडी टेकडी फोडून वैनगंगेच्या प्रवाहाला मोकळा वाट नृसिंह व विरसिंहांनी करुन दिल्यानेच परिसरात महाप्रलय बंद झाले होते, अशी आख्यायीका आहे. भगवान राम, लक्ष्मण व सीता येथे वनवासाप्रसंगी काही काळ व्यास्तव्यास होती, अशीही आख्यायीका आहे. विस्तीर्ण नदीपात्र, स्वच्छ पाणी, राज्य महामार्गाचे व रेल्वे मार्गाचे जाळे व गाड्यांची रेलचेल हे या धार्मिक व पर्यटनीय स्थळाचे वैशिष्ट्ये आहे. महाराष्ट्र पर्यटन महामंडळ, राज्य शासन व केंद्र शासनाचे येथे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. गंगा नदीच्या स्वच्छतेच्या व विकासाच्या अनेक योजना कार्यान्वित होण्यापासून दुर्लक्षित आहेत. परंतु गंगेकडे एकही योजना प्रस्तावित नाही.
तुमसर शहरापासून १० किमी अंतरावर असलेले हे धार्मिक व पर्यटन स्थळ उपेक्षित आहे. या स्थळाला अनेक प्रतिनिधींनी भेट दिल्या, कुणी या स्थळाला मिनी पंढरी तर कुणी मिनी कन्याकुमारीची उपमा देवून गेले. बारमाही वाहणारी वैनगंगा नदी, विस्तीर्ण जलपात्र यामुळे येथे बोटींगची व्यवस्था होऊ शकते. स्थळाचे सौंदर्यीकरण होवू शकते. मात्र या सुविधांकडेही कायमचे दुर्लक्ष होत आहेत. पतीत पावन स्थळाच्या विकासातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील, या दृष्टीने लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले पाहिजे. आतापर्यंत मंदिराच्या पायऱ्यांचे बांधकामाशिवाय संरक्षण भींत तयार करण्यात आली. भक्त निवासाची सोय नाही.धापेवाडा, माडगी बॅरेजमध्ये पाणी अडविल्याने या गोसीखुर्दचा बॅक वाटरमुळे माडगी येथे मुबलक पाणी आहे. सध्या मंदिराच्या पायथ्याशी पाणी आहे. त्यामुळे दगडी टेकडीवर मंदिरात जावे लागते. वृध्द महिला पुरुषांना मंदिरात जाण्यास अडचण होत आहे. (वार्ताहर)