रेती घाटांवरील स्थगिती उठविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 01:15 AM2019-06-12T01:15:21+5:302019-06-12T01:15:40+5:30

जिल्ह्यातील रेतीघाटाच्या लिलावाला उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यात आली असून आता लिलाव झालेल्या घाटातून रेती उत्खननाला परवानगी देण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहेत.

Wake up the suspension on the sand ghats | रेती घाटांवरील स्थगिती उठविली

रेती घाटांवरील स्थगिती उठविली

googlenewsNext
ठळक मुद्देअप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : उच्च न्यायालयाने लिलावाला दिली होती स्थगिती

संजय साठवणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : जिल्ह्यातील रेतीघाटाच्या लिलावाला उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यात आली असून आता लिलाव झालेल्या घाटातून रेती उत्खननाला परवानगी देण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहेत.
भंडारा जिल्ह्यात वैनगंगा, चुलबंद, बावनथडी यासह नदी, नाल्यांवर रेतीघाट आहेत. भंडारा जिल्ह्यातील रेती विदर्भात प्रसिद्ध असून येथील रेतीला सोन्याचे भाव आहेत. त्यामुळेच येथील रेतीघाट लिलावात घेण्यासाठी कंत्राटदारांच्या उड्या पडतात. महसूल प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील काही रेतीघाटाचे लिलाव करण्यात आले होते. मात्र याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरून उच्च न्यायालयाने ३० एप्रिल रोजी आदेश देवून जिल्ह्यातील लिलाव झालेल्या घाटातील रेती उत्खननास स्थगिती देण्यात आली होती. या स्थगितीवर रेतीघाट मालकांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. यावर नागपूर खंडपिठाने आदेश देत ३० सप्टेंबरपर्यंत रेती उत्खनन व वाहतुकीस परवानगी दिली आहे.
न्यायालयाचा आदेश अप्पर जिल्हाधिकारी विलास ठाकरे यांना प्राप्त होताच त्यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना पत्र पाठवून २०१८-१९ वर्षासाठी लिलाव झालेल्या रेतीघाटातून उत्खनन व वाहतूक सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे आता जिल्ह्यातील लिलाव झालेल्या रेतीघाटातून रेती उत्खननाला सुरूवात होणार आहे. साकोली तालुक्यात यावर्षी परसोडी व पवारटोली या दोनच रेतीघाटाचा लिलाव झालेला आहे. उर्वरित लहानगाव, उमरी, लवारी, कुंभली, धर्मापुरी या रेतीघाटाचा लिलाव झाला नाही. त्यामुळे ज्या रेतीघाटाचा लिलाव झालेला आहे त्यातूनच रेती उत्खनन करता येणार आहे.

स्थगितीकाळात खुलेआम वाहतूक
उच्च न्यायालयाने जिल्ह्यातील रेतीघाटातील रेती उत्खननाला स्थगिती दिली होती. मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील बहुतांश रेतीघाटावर खुलेआम रेतीतस्करी सुरू होती. अनेक ठिकाणी महसूल व पोलीस विभागाने केलेल्या कारवाईत हा प्रकार उघडकीस आला होता. रोहा रेतीघाटावर तर जेसीबीच्या धक्क्याने एक विद्यार्थी ठार झाला होता. अनेक ठिकाणी रेती वाहतुकीवरून रेती कंत्राटदार आणि महसूल कर्मचाºयात वादही झाले आहेत. आता नियमानुसार रेतीचे उत्खनन केले जाणार आहे. मात्र लिलाव न झालेल्या रेतीघाटाच्या उत्खननाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Wake up the suspension on the sand ghats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू