करडी परिसरात पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 10:31 PM2019-05-09T22:31:24+5:302019-05-09T22:31:44+5:30
करडी परिसर लहान मोठ्या २८ तलावांनी समृद्ध आहे. मात्र, यातील मध्यम प्रकल्पांना अखेरची घरघर लागली आहे. घोटभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ आहे तर लहान तलाव व बोड्यांत पाण्याचा ठणठणाट आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : करडी परिसर लहान मोठ्या २८ तलावांनी समृद्ध आहे. मात्र, यातील मध्यम प्रकल्पांना अखेरची घरघर लागली आहे. घोटभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ आहे तर लहान तलाव व बोड्यांत पाण्याचा ठणठणाट आहे.
भुगर्भातील पाण्याची पातळी खाली गेल्याचा परिणाम म्हणून गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत यावर्षी २० गावांचा समावेश आहे. मात्र तलाव खोलीकरणासाठी मिळणारा निधी ३ ते ६ लाखांचा असल्याने निधी वाढविण्याची मागणी होत आहे. मोहाडी तालुक्याचा करडी परिसर कोका वन्यजीव अभयारण्य व वैनगंगा नदीच्या मध्यभागी वसलेला आहे.
वनांनी समृद्ध परिसरात लहान मोठ्या तलावांची संख्या २८ आहे. मात्र, या तलावांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने पाण्याचा भीषण प्रश्न उद्भवला आहे. खरीपातही सिंचनाची खरीपातही सिंचनाची समस्या वाढली आहे. निव्वळ पिण्याच्या पाण्याचीच नव्हे तर वापराच्या पाण्यासाठी सुद्धा बोंबा बोंब आहे. करडी करडी परिसरात देव्हाडा, नरसिंग टोला, देव्हाडा बुज, निलज खुर्द, निलज बुज, मोहगाव, नवेगाव, दवडीपार, करडी, जांभोरा, किसनपूर, लेंडेझरी, केसलवाडा, खडकी, पालोरा, बोंडे, मुंढरी बुज., मुंढरी खुर्द, कान्हळगाव, बोरगाव, ढिवरवाडा आदी गावात ही तलाव आहेत.
कधी न आटणारे केसलवाा, जांभोरा, किसनपूर येथील तलाव अखेरच्या घटका मोजत आहेत. लहान तलाव व बोड्या पाण्याविणा कोरड्या आहेत.
या तलावांत मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. काही तलावांत शेतकऱ्यांनीच अतिक्रमण केल्याने तलावांचे रूपांतर बोड्यांत झाले आहेत.
तर बोड्या नामशेष होण्याच्या मार्गात आहेत. तलावांच्या पोटात मोठ्या प्रमाणात अवैध रेती केली जात आहे. शेतीसाठी तलावांना फोडण्याचे काम होत आहेत. गेट वारंवार लिकेज केल्या जात असल्याने खरीपातच तलावांतील पाणी नाहीसे होते. यावर उपाययोजनांची गरज आहे.
गणपती तलावासारखे मॉडेल तलाव तयार करा
शासनाचे वतीने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सन २०१५-१६ मध्ये परिसरातील ४ गावे जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट केली. यात करडी, मोहगाव, देव्हाडा, बोरी, पांजरा गावांचा समावेश आहे. तर करडी गावातील गणपती तलावाला दोन टप्प्यात सुमारे ४० लाखाचा निधी दिला गेला. त्यामुळे तलावाचे योग्य खोलीकरण होवून एक मॉडेल तलाव तयार झाले. आज गणपती तलावातील पाण्याचा दुष्काळ संपला आहे. सन २०१७-१८ मध्ये परिसरातील पालोरा, खडकी, बोंडे, डोंगरदेव, दवडीपार, नवेगाव, जांभळापाणी आदी गावांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेने अतिक्रमण काढण्यासाठी स्पेशल टिम तयार करून मोजणी केल्यास तलावांना मोकळाश्वास घेता येईल. त्याचबरोबर खोलीकरणासाठी गणपती तलावाच्या धर्तीवर मॉडेल तलाव निर्माणासाठी किमान ३० ते ३५ लाखाचा निधी देणे गरजेचे आहे.
-धामदेव वनवे, सरपंच ढिवरवाडा.