जिल्ह्यात कोविड रुग्णाच्या नातेवाइकांची प्लाझ्मा मिळविण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:27 AM2021-04-29T04:27:05+5:302021-04-29T04:27:05+5:30
जिल्ह्याची सध्याची परिस्थिती पाहता आरोग्य व्यवस्था बहुतांशी प्रमाणात कोलमडलेली असल्याचे पाहावयास मिळत आहे. अशात रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन, प्लाझ्मा, बेड ...
जिल्ह्याची सध्याची परिस्थिती पाहता आरोग्य व्यवस्था बहुतांशी प्रमाणात कोलमडलेली असल्याचे पाहावयास मिळत आहे. अशात रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन, प्लाझ्मा, बेड इत्यादी मिळविण्यासाठी रुग्णाच्या नातेवाइकांना धडपड करावी लागते आहे.
रुग्णांना भासत असलेल्या प्लाझ्माची कमतरता भरून काढण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक रक्तपेढ्यांमध्ये असलेल्या प्लाझ्मा बँककडे धाव घेत आहेत. प्रत्येक वेळी असे नाही की रुग्णांच्या नातेवाइकांना प्लाझ्मा मिळेल व कोविड रुग्ण बरे होण्यास मदत होईल. भंडारा जिल्ह्यात प्लाझ्मा बँक अस्तित्वात असली, तरीही वेळोवेळी प्लाझ्मा उपलब्ध नसतो. अशावेळी रुग्णांचे नातेवाईक कुठून तरी प्लाझ्मादात्यांचा शोध घेत असतात. एकदा का प्लाझ्मा दान देणारा दाता तयार झाला तर त्याला एखाद्या प्लाझ्मा काढण्याच्या ठिकाणी घेऊन जावे लागते; पण ही प्लाझ्मा काढण्याची व्यवस्था सध्या भंडारा जिल्ह्यात एकाही ठिकाणी अस्तित्वात नाही.
जिल्ह्यातील बहुतांश रुग्णांच्या नातेवाइकांना प्लाझ्मा मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. त्यांना गरजेच्या वेळी जिल्ह्यात प्लाझ्मा उपलब्ध झाला नाही तर प्लाझ्मादात्याला नागपूरसारख्या ठिकाणी नेऊन प्लाझ्मा काढून घेऊन पुन्हा भंडाऱ्यात आणावे लागते. ही सर्व बाब फार खर्चीक आहे, त्यासोबतच वेळ घेणारी आहे; त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना व प्लाझ्मादात्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. काही वेळा प्लाझ्मादाते नागपूरला जाण्यास तयार नसतात.
रुग्णांची होणारी ही अडचण दूर करण्यासाठी जिल्ह्यात पूर्ण वेळ सुरू असणारी व प्लाझ्माची देवाण - घेवाण करता येईल अशी प्लाझ्मा बँक स्थापन करावी, अशी मागणी पवनी येथील अखिल मुंडले यांनी पालकमंत्री विश्वजीत कदम व जिल्हाधिकारी भंडारा यांना केली आहे.
रुग्णाला प्लाझ्माची नितांत गरज असूनही त्याला जिल्ह्यात प्लाझ्मा उपलब्ध झाला नाही. त्यावर उपाय म्हणून आम्ही प्लाझ्मादात्यांचा शोध घेतला; पण जिल्ह्यात कुठेही प्लाझ्मा काढण्याची सोय नसल्यामुळे त्यांना नाइलाजास्तव नागपूरला पाठवावे लागले.