वैनगंगा धोक्याच्या पातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:49 AM2019-08-10T00:49:42+5:302019-08-10T00:50:57+5:30
आठ दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने शुक्रवारी उसंत घेतली असली तरी धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. गोसेखुर्द प्रकल्पाचे ३३ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आठ दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने शुक्रवारी उसंत घेतली असली तरी धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. गोसेखुर्द प्रकल्पाचे ३३ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात संजय सरोवर, पुजारीटोला, कालीसराड व इडियाडोह या धरणामुळे पूर परिस्थिती निर्माण होवू शकते. धापेवाडा आणि पुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. भंडारा शहरानजीक कारधा येथे शुक्रवारी दुपारी ४ वाजता वैनगंगा नऊ मीटर या इशारा पातळीवरून वाहत होती. रात्रीतून या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून कारधा येथे वैनगंगेची धोका पातळी ९.५ मीटर आहे.
जिल्ह्यात नदीकाठावर १५४ गावे आहेत. या गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्याची सरासरी पर्जन्यमान १३३० मीमी असून आतापर्यंत जिल्ह्यात ६३६.८ मीमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती प्राधीकरणाची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. जिल्ह्यात सर्व यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहे.
दरम्यान पवनी तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे १७ दरवाजे एक मीटरने तर १६ दरवाजे अर्धा मीटरने सायंकाळी ५ वाजता उघडण्यात आले आहे. या प्रकल्पातून सहा हजार ९४५ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ११४६.०८ दलघमी असून उपयुक्त जलसाठा क्षमता ७४०.१७ दलघमी आहे. शुक्रवारी या जलाशयाची पातळी २४२.८५० मीटर मोजण्यात आली. तर उपयुक्त पाणीसाठा २६२.४६ दलघमी आहे.
आठ दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत होता. शुक्रवारी या पावसाने उसंत घेतली. मोहाडी तालुक्याकडे मात्र वरूणराजाची वक्रदृष्टी दिसत आहे. येथे दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत होता. अनेकांच्या शेतात रोवणीसाठीसुद्धा पाणी नाही. भंडारा तालुक्यातील मोहदुरा, खुर्शीपार पुलावर पुराचे सावट असून हा मार्ग काहीकाळ बंद होता.