गोदामे हाऊसफुल्ल; धानाचे मोजमाप झाले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:32 AM2021-01-18T04:32:34+5:302021-01-18T04:32:34+5:30
प्रशासनाकडे असलेल्या नोंदीनुसार भंडारा जिल्ह्यात पीक लागवडीखालील क्षेत्र २ लाख १० हजार हेक्टर आर आहे. यापैकी सुमारे १ लाख ...
प्रशासनाकडे असलेल्या नोंदीनुसार भंडारा जिल्ह्यात पीक लागवडीखालील क्षेत्र २ लाख १० हजार हेक्टर आर आहे. यापैकी सुमारे १ लाख ८२ हजार हेक्टर आर क्षेत्रात यंदाच्या खरीप हंगामात धानाची लागवड करण्यात आली. जिल्ह्यात तीन लाख पेक्षा अधिक शेतकरी संख्या आहे. मुख्य पीक धानाचे घेतले जाते. यात हलके, मध्यम व अधिक कालावधीच्या धानाची लागवड केली जाते. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत धानाचे उत्पन्न हाती येते. जिल्ह्यात खरीप व उन्हाळी हंगामात लाखो टन धानाचे उत्पादन होते. कुबेर नगरी तुमसर येथे राज्यातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ आहे. येथे हंगामात १२ हजार पेक्षा अधिक पोती धानाची आवक दिवसाला व्हायची.
धान विक्रीसाठी शेतकऱ्यांना आठवडाभर प्रतीक्षा करावी लागायची. सकाळी ११ वाजता सुरू होणारे धानाचे मोजमाप दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत सुरू राहायचे; मात्र यंदा तशी स्थिती नाही. कारण राज्य शासनाने केंद्र शासनाच्या हमीभाव व्यतिरिक्त धानाला ७०० रुपये प्रति क्विंटल सानुग्रह अनुदान (बोनस) वाढीची घोषणा केली. यानंतर २१ डिसेंबर रोजी या संदर्भात शासन परिपत्रक जारी केले.
शासकीय धान्य खरेदी केंद्रावर धान्य विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० क्विंटलच्या मर्यादेत प्रति क्विंटल सातशे रुपये बोनस मिळणार आहे. याचा परिणाम, तसेच यंदा जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी त्यानंतर पिकांवर मोठ्या प्रमाणात झालेला मावा, तुडतुडा या किडींचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे तुमसर येथील बाजार समितीत धानाची आवक प्रचंड मंदावली आहे. आजस्थितीत तुमसर बाजार समिती येथे २५०० ते तीन हजार पोते धानाची आवक आहे, तर दुसरीकडे हमीभाव केंद्रावर धानाची प्रचंड आवक वाढली आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे भंडारा जिल्ह्यात ७५ हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू आहेत. आजपर्यंत आठ लाख क्विंटलपेक्षा अधिक धानाची खरेदी जिल्हा प्रशासनाने केली आहे. अनेक केंद्रावरील गोदामे भरल्याने धानाचे मोजमाप बंद आहे, तर हजारो पोते धान केंद्रावर असुरक्षितपणे विक्रीच्या प्रतीक्षेत पडून आहे. एकूणच महाआघाडी शासनाच्या सानुग्रह अनुदानामुळे तुमसरसह जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांमध्ये धानाची आवक प्रचंड घटली असल्याचे बोलले जाते.
बॉक्स
हमीभावानुसारच चुकारे
सन २०२०-२१ हंगामासाठी केंद्र शासनाने साधारण धानाला १८६८, तर उच्चश्रेणी धानाला १८८८ रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केला आहे. राज्य शासनाने ७०० रुपये प्रति क्विंटल धानाला भाववाढ केली आहे, पण सध्या केंद्रावर धान्य विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना १८६८ रुपये प्रति क्विंटल दराने चुकारे मिळत आहेत.