गोदाम हाऊ सफुल्ल; धान खरेदी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 10:48 PM2018-12-17T22:48:56+5:302018-12-17T22:50:12+5:30
स्थानीक साकोली तालुका शेतकी खरेदी विक्री समितीद्वारे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात हमी भाव धान खरेदी केंद्र सुरु केले आहे. लाखनी केंद्रावर अद्यापर्यंत १० हजार क्विंटल धान खरेदी केली आहे. गोदामाअभावी धान खरेदी थांबल्याने शेतकरी संकटात सापडले आहे.
चंदन मोटघरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : स्थानीक साकोली तालुका शेतकी खरेदी विक्री समितीद्वारे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात हमी भाव धान खरेदी केंद्र सुरु केले आहे. लाखनी केंद्रावर अद्यापर्यंत १० हजार क्विंटल धान खरेदी केली आहे. गोदामाअभावी धान खरेदी थांबल्याने शेतकरी संकटात सापडले आहे.
लाखनी केंद्रावर तालुक्यातील गडेगाव, किन्ही, केसलवाडा (वाघ), गराडा, सिपेवाडा, चान्ना, धानला, सोमलवाडा, मेंढा (सोमलवाडा), मुरमाडी (सावरी), सावरी, सोनेखारी, लाखनी, खुर्शिपार, मलकाझरी, नवेगाव, पुरकाबोडी, दैतमांगली अशा १८ गावांतील शेतकरी धान हमी भाव केंद्रावर नेत असतात.
लाखनी केंद्रावरील धान खरेदी गोदामाअभावी बंद असल्याने हजारो क्विंटल धान धान खरेदी केंद्राबाहेर उघडयावर आहे. पावसाने धानाची पोती ओली होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. मागील वर्षो कृषी उत्पन्न बाजार समितीने धान खरेदीसाठी मोठे गोदाम उपलब्ध करुन दिले होते. यावर्षी धानखरेदीसाठी लहान गोदाम दिल्याने केवळ १० हजार क्विंटल धान खरेदी करता आली आहे.
लाखनी केंद्रावर केसलवाडा (वाघ) परिसरातील शेतकºयांचे ५० ते ६० टक्के धान खरेदी केंद्रावर जमा होत असते. वजन होत नसल्याने अनेक शेतकºयांचे धान खरेदी केंद्रावर पडून आहे. धान खरेदी केंद्रावर धान ठेवायला जागा नसल्याने केसलवाडा (वाघ) येथील शेतकऱ्यांनी धान घरीच भरून ठेवले आहे. अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही चुरणे केलेले नाही.
लाखनी येथील धान खरेदी केंद्र बंद असल्याने व केसलवाडा (वाघ), गडेगाव येथील शेतकऱ्यांना त्रासदायक होत असल्याने सेवा सहकारी संस्थाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना धान खरेदी केंद्राचे परवानगी मागण्यासाठी पत्र २३ जुलै २०१८ रोजी देण्यात आले. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले. सेवा सोसायटीकडे गोदाम उपलब्ध आहे. गडेगाव येथील सेवा सहकारी सोसायटीने गोदाम उपलब्ध केले असतांना केसलवाडा (वाघ) व गडेगाव येथील शेतकऱ्यांनी सेवा सहकारी सोसायटीद्वारे धान खरेदी केंद्र सुरु केल्यास लाखनी येथील केंद्रावरील ताण कमी होईल. परंतु याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
खरेदी केलेला धान मिलिंगसाठी बाहेर काढण्याची परवानगी मिळालेली आहे. गोदाम रिकामे झाल्यानंतर काटा करण्यात येईल. अन्यथा धान खरेदी करुन बाजार समितीच्या शेडमध्ये ठेवण्याची व्यवस्था करणार आहेत.
- घनश्याम पाटील खेडीकर, सभापती, खरेदी विक्री समिती.
केसलवाडा (वाघ) येथील शेतकऱ्यांचे धान लाखनी केंद्रावर पडून आहे. सेवा सोसायटीने धान खरेदीची परवानगी मागितलेली आहे. धान शेतकऱ्यांना शासनाच्या धोरणामुळे त्रास सहन करावा लागत आहे.
- श्यामराव वाघाये, अध्यक्ष सेवा सोयायटी, केसलवाडा (वाघ).
केसलवाडा (वाघ) व गडेगाव येथे तात्काळ धान खरेदी केंद्र सुरु करु अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेवून आंदोलन करावे लागेल.
- दिनेश वासनिक, सामाजिक कार्यकर्ता, केसलवाडा (वाघ) .