धानाच्या थकीत चुकाऱ्यासाठी आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:38 AM2021-08-19T04:38:51+5:302021-08-19T04:38:51+5:30
शेतकऱ्यांची धानाचे विक्रीत लूट होणार नाही, याकरिता शासनाने उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरू केले आहे. गावात केंद्र सुरू करून ...
शेतकऱ्यांची धानाचे विक्रीत लूट होणार नाही, याकरिता शासनाने उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरू केले आहे. गावात केंद्र सुरू करून शेतकऱ्यांचे हितचिंतक असल्याचा संदेश गेला आहे. गावातील केंद्रावर शेतकऱ्यांनी धानाची विक्री गेल्या तीन महिन्यापूर्वी केली आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामातील लागवडीसाठी चुकारे मिळण्याची अपेक्षा होती. परंतु चुकारे मिळाले नाही. कधी मिळतील असे निश्चित सांगणात नाहीत. सत्ताधाऱ्यांना विचारले असता केंद्र शासनावर खापर फोडले जात आहे. विरोधक राज्य शासनाला धारेवर घेत आहे. चुकारे कुठे अडले याची माहिती शेतकऱ्यांना नसल्याने ते चक्रावले आहेत. खरीप हंगामातील धान पिकाचे लागवडीसाठी आलेला खर्च शेतकरी देऊ शकले नाही. हातात पैसाच नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. थकीत चुकाऱ्यासाठी रोज शेतकरी चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत आहेत. चुकारे मिळण्याची शक्यता लांबणीवर जात असल्याने मजूर, शेतमजूर वेतनासाठी थांबण्याच्या मानसिकतेत नाहीत. यामुळे सावकारांच्या दारात थेट शेतकऱ्यांनी थाप मारण्यास सुरुवात केली आहे. कर्जाच्या विळख्यात शेतकरी पुन्हा अडकला आहे. शासनाच्या दुर्लक्षित पणामुळे शेतकरी नागवला जात आहे. उन्हाळी धानाचे चुकारे अडलेल्या चुल्हाड बसस्थानकावर तुमसर बपेरा राष्ट्रीय महामार्गावर २२ ऑगस्टला सकाळी ११ वाजता किसान गर्जना संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
कोट
गत तीन महिन्यांपासून उन्हाळी धानाचे चुकारे अडले आहेत. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आत्महत्यांच्या निर्णयापर्यंत शेतकरी पोहचला असताना चुकारे दिले जात नाही. यामुळे रास्ता रोको आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
राजेंद्र पटले, अध्यक्ष, किसान गर्जना, तुमसर
कोट
निश्चितच शेतकऱ्यांना उन्हाळी धानाचे चुकारे मिळाले पाहिजे, यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे.
अरविंद राऊत, सिहोरा