हातपाय धुणे जिवावर बेतले; कालव्यात बुडून काका-पुतण्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 08:31 PM2022-04-06T20:31:56+5:302022-04-06T20:32:21+5:30
Bhandara News मोहफुले वेचण्यासाठी गेलेल्या काका पुतण्याचा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली.
भंडारा : जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेल्यानंतर कालव्यात उतरून हातपाय धुणे काका-पुतण्याच्या जीवावर बेतले. तुमसर तालुक्यातील आसलपानी येथील कारली लघुकालव्यात बुडून काका-पुतण्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
शाहील राजेश कोकोडे (१२) आणि हौसीलाल हिरदेराम कोकोडे (२४, दोघेही रा. आसलपानी ता. तुमसर) अशी मृतांची नावे आहेत. बुधवारी सकाळी शाहील व हौसीलाल जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेले होते. दुपारी घराकडे परत येत असताना वाढत्या तापमानामुळे घामाने भिजल्याने हातपाय धुण्यासाठी दोघेही कारली लघुकालव्यात उतरले. दरम्यान, तोल जाऊन दोघेही पाण्यात पडले. तेथे वाचवण्यासाठी कुणीही नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शाहील हा येरली येथील आश्रमशाळेत सातव्या वर्गात शिकत होता. गुरुवारी तो आश्रमशाळेत जाणार होता, त्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने संपूर्ण आसलपानी गावावर शोककळा पसरली आहे.