वैनगंगा नदी धरण मार्गावर सीसीटीव्हीचा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:06 AM2021-03-04T05:06:57+5:302021-03-04T05:06:57+5:30
रंजित चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा) : गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना जोडणाऱ्या वैनगंगा नदी धरण मार्गावर होणाऱ्या अनुचित घटना ...
रंजित चिंचखेडे
चुल्हाड (सिहोरा) : गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना जोडणाऱ्या वैनगंगा नदी धरण मार्गावर होणाऱ्या अनुचित घटना आणि आत्महत्या रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे. पर्यटकांची वाढती गर्दी होत असल्याने नियंत्रण ठेवण्यासाठी कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु चौकशी करताना पोलीस कानावर हात ठेवत असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प, अदानी वीज प्रकल्प, खैरबंधा जलाशयात वैनगंगा नदीतील पाणी उपसा करण्यासाठी कवलेवाडा वांगी गावांचे शेजारी धरणांचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरण बांधकामामुळे गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील गावे थेट जोडण्यात आली आहेत. तिरोडा शहरात पोहाेचण्यासाठी सिहोरा परिसरातील नागरिकांना तुमसर गाठून जावे लागते. ४० किमी अंतराचा अतिरिक्त फेरा होत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत होता. धरण बांधकाम झाल्याने या अंतरमध्ये मोठी कपात झाली आहे. सिहोरा आणि तिरोडा शहराला जोडणारे अंतर १३ किमी झाले आहे. या शिवाय सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळाली आहे. भाजीपाला विक्री करीता शेतकरी तिरोडा शहर गाठत आहेत. अदानी व अन्य प्रकल्प आल्याने रोजगाराची साधने निर्माण झाले आहेत.
दरम्यान धरणात पाणी अडविण्यात आले आहेत. पाणी अडविण्यात आल्याने १८ किमी अंतरापर्यंत वैनगंगा नदी पात्रात पाणी आहे. नदी पात्रात पाणी अडविण्यात आल्याने सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. एरवी उन्हाळ्यात विहिरीची पाण्याची खोलवर जाणाऱ्या पातळीला ब्रेक लागला आहे. विहिरी, तलाव, बोरवेल्स, बोड्या, नाले, पाण्याने तुडुंब भरले आहेत. धरणात पाणी अडविण्यात आल्याने विहंगम दृश्य पर्यटकांना भुरळ घालत आहेत. यामुळे पर्यटकांची वाढती गर्दी राहत आहे. याच धरणाचे लगत खुल्या मैदानात ओल्या पार्टी होत आहेत. प्रशासनाने धरण व परिसराला प्रतिबंध क्षेत्र घोषित केला आहे. या आशयाचे फलक लावण्यात आले आहे. परंतु कुणी ऐकत नाहीत, यामुळे भागातील डोहात अनेकांचा हकनाक जीव गेला आहे. सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही. आता अनुचित घटना टाळण्यासाठी धरण मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून निगराणी ठेवण्यात येत आहे.
बॉक्स
रस्त्यावर खड्डेच खड्डे
सिहोरा ते तिरोडा १३ किमी अंतराच्या मार्गावर खड्डेच खड्डे आहेत. वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. धरणावरून तिरोडा कडे जाणारा मार्ग पूर्णतः उखडला आहे. पायदळ चालनेही कठीण होत आहे. यामुळे वाढते अपघात आहेत. या रस्त्यावरून वाढती वर्दळ राहत असल्याने खड्डेमय झाला आहे. प्रशासनाने रस्ता दुरुस्ती करीता लक्ष घालण्याची गरज आहे. तत्काळ रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी भाजपचे युवा नेते किशोर राहगडाले, भाजप युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष विनोद पटले, गोंडीटोला ग्रामपंचायत सदस्य शितल चिंचखेडे, धनेगावच्या सरपंच सुषमा पारधी यांनी केली आहे.