पिकांवरील किडींवर क्रॉप-सॅप अॅपद्वारे वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 03:57 PM2018-08-25T15:57:14+5:302018-08-25T15:59:20+5:30
खरीप हंगामात विविध पिकांवर येणाऱ्या किडींमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. हा प्रकार टाळण्यासाठी कृषी विभागाने आता आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाच्या (क्रॉप-सॅप) अॅपद्वारे किडींवर लक्ष ठेवून शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन केले जाणार आहे.
ज्ञानेश्वर मुंदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : खरीप हंगामात विविध पिकांवर येणाऱ्या किडींमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. उत्पन्नापेक्षा कीड नियंत्रणावरच अधिक खर्च होतो. हा प्रकार टाळण्यासाठी कृषी विभागाने आता आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाच्या (क्रॉप-सॅप) अॅपद्वारे किडींवर लक्ष ठेवून शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन केले जाणार आहे. यातून कीड-रोगांचे नियंत्रण करणे सुलभ होणार आहे.
राज्य कृषी विभागाच्यावतीने कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प संपूर्ण राज्यात राबविला जात आहे. भात, सोयाबीन, कापूस, तुर, हरभरा पिकांसाठी हा प्रकल्प आहे. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र पुणे (एनआयसी) यांनी विकसीत केलेल्या संगणक प्रणाली व मोबाईल अॅप्लीकेशनच्या माध्यमातून पिकांवरील किडींवर लक्ष ठेवले जाणार आहे. कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक आणि कृषी मंडळ अधिकाऱ्यांच्या माध्यामातून आॅनलईन माहिती संकलित केली जाणार आहे. स्थानिक कृषी विभागाचे कर्मचारी निवडलेल्या पिकांच्या प्लॉटचे निरीक्षण करतील. त्याचे फोटो मोबाईलमध्ये काढून अॅपमध्ये डाऊनलोड करतील. या माहितीचे संकलन एनआयसी पुणे येथे होणार आहे. त्यानंतर कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ संस्कारीत माहितीचे विश्लेषण करून तालुकानिहाय उपाययोजना सूचविणार आहेत. किडींच्या नियंत्रणासाठी असलेल्या सूचना प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचविल्या जाईल.
या प्रकल्पासाठी कृषी विभागाने निकडक गावांमध्ये पीक प्लॉटची निवड केली आहे. एक बाय एक चौरस मीटर पिकांचे निरीक्षण करून किडींची माहिती संकलीत केली जाईल. भात पिकासाठी १४ नोव्हेंबर पर्यंत सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यात खोककिडा, गादमाशी, लष्करी अळी, तुळतुळे, निळे भुंगुरे, हिस्पा, पानावरील करपा, पर्णकोष करपा आणि जीवाणूजन्य करप्याचे निरीक्षण करून त्याचे मोबाईलद्वारे फोटो काढून अॅपद्वारे एनआयसीकडे पाठविले जाणार आहे. कपाशीसाठी २९ डिसेंबरपर्यंत सर्वेक्षण केले जाणार असून गुलाबी बोंडअळीसह विविध किडींवर कृषी विभागाचे लक्ष राहणार आहे. सोयाबीनसाठी सर्वेक्षणाचा कालावधी २९ सप्टेंबर, तुर २९ डिसेंबर आणि हरभरा पिकांचे सर्वेक्षण १६ फेब्रुवारीपर्यंत केले जाणार आहे. दर आठवड्याला याबाबतची माहिती अॅपद्वारेच आॅनलाईन पद्धतीने पुणे एनआयसीकडे पाठविली जाईल. या प्रकल्पामुळे कोणत्या भागात नेमका कोणता रोग आला आहे हे कळण्यास तात्काळ मदत होईल. तसेच त्यावर कोणत्या उपाययोजना करायच्या हे कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ सांगणार आहेत. त्यामुळे वेळेतच किडीचे नियंत्रण करून कीड नियंत्रणासाठी होणारा मोठा खर्च टाळता येणार आहे. भंडारा जिल्ह्यात अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने धान पिकांसाठी हा प्रकल्प यशस्वीरित्या राबविला जात आहे.
क्रॉप सॅपसाठी ४१ कोटींचा निधी
कीड नियंत्रणासाठी शासनाच्या कृषी विभागाने सुरु केलेल्या कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पासाठी (क्रॉप-सॅप) शासनाने भरीव निधीची तरतूद केली आहे. शासन निर्णयावर ४१ कोटी ४७ लाख ८ हजार रुपये यावर खर्च होणार आहे. पहिल्या टप्प्यात १० कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. कृषी पर्यवेक्षक व बाह्य स्त्रोतांद्वारे सेवा उपलब्ध करून पिकांवरील किडींचे सर्वेक्षण करून नियंत्रण केले जाईल.