जिल्ह्यातील रेती घाटांवर ड्रोन कॅमेऱ्यांचा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 10:31 PM2018-08-01T22:31:16+5:302018-08-01T22:31:36+5:30
जिल्ह्यातील घाटांवर होणारी रेतीची तस्करी रोखण्यासाठी आता जिल्हा प्रशासन ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेणार आहे. या कॅमेऱ्यांच्या मदतीने तस्करी रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच पोलीस व महसूल विभाग संयुक्तपणे कारवाई करून रेती तस्करांच्या मुसक्या आवळतील अशी महिती जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील घाटांवर होणारी रेतीची तस्करी रोखण्यासाठी आता जिल्हा प्रशासन ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेणार आहे. या कॅमेऱ्यांच्या मदतीने तस्करी रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच पोलीस व महसूल विभाग संयुक्तपणे कारवाई करून रेती तस्करांच्या मुसक्या आवळतील अशी महिती जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
खाजगी प्रयोजनासाठी प्रत्येक नागरिकास दोन ब्रास गौण खनिज वापराची मुभा असली तरी सुध्दा तहसीलदाराची परवानगी घेणे आवश्यक आहे. शासकीय घरकुल बांधकामासाठी लागणाºया गौण खनिजासंदर्भात ग्रामपंचायतने एकत्रित ठराव दिल्यास परवानगी देणे सोयीचे होईल असे जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी सांगितले. अवैद्य रेती चोरी व वाहतुकीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, मुख्य अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम उपस्थित होते.
जिल्हाधिकारी माहिती देतांना म्हणाले की, शासन निर्णयाप्रमाणे खाजगी प्रयोजनासाठी तहसीलदारांची परवानगी आवश्यक असून त्यासाठी स्वामित्वधन आकारण्यात येणार नाही. रेतीचोरी प्रकरणात रेतीपूर्ण अवैध धरण्यात येणार असून वाहनावर दंडाची रक्कम आकारणी करुन शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे पाचपट दंड आकारण्यात येईल. यासंदर्भात उपपरिवहन प्रादेशिक अधिकाºयांना सुद्ध कारवाईचे अधिकार असून वाहनाची नोंदणी रद्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रेतीघाटावर सीसीटीव्ही व जीपीएस लावण्याचे प्रयोजन आहे. त्यामुळे रेती चोरी व अवैध खनिज उत्खननावर आळा बसेल. अवैध रेती तस्करास जिल्ह्यातून तडीपार सुद्धा करण्यात येईल, असे ते म्हणाले.
रेती वाहतूकीवर आळा घालण्यासाठी अतिरिक्त चौकी तयार करण्याचे प्रस्तावित आहे. रेतीचोरी प्रकरणात २८ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये आठ गुन्हे दंडात्मक असून १५ लाख ८५ हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तसेच ४ लाख ५१ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. पोलीस व महसूल विभाग व इतर यंत्रणा मिळून एकूण ५९ प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. रेतीचोरीबाबत वाहनचालकासोबतच वाहन मालकावर कारवाई करण्यात येणार असल्याचे माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी दिली.अवैध उत्खनन व अवैध वाहतूकीमध्ये लिलावधारक दोषी आढळल्यास त्याचा करारनामा रद्द करण्यात येईल तसेच त्यांचे अनामत स्वरुपात जमा असलेली सुरक्षा ठेव व बक गॉरंटी शासनजमा करण्यात येवून भारतीय दंड विधी संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. नवोदय विद्यालयाची सद्याची इमारत ही वास्तव्यास धोकादायक असल्याने विद्यालय इतरत्र शासकीय किंवा अल्पसंख्याक मुलीचे वस्तीगृहात तात्पुरते स्थानांतरित करण्यात येईल. केंद्रीय नवोदय विद्यालयाचे पूणे येथील उपआयुक्तांकडे याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला असून लवकरच स्थानांतर प्रक्रिया करण्यात येईल. पालकांनी संमती दिल्यास त्यांच्या पाल्यांना इतर जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात तात्पुरते स्थानांतरित केल्या जाईल, असे सांगितले.
१८ रेतीघाटावरून रेती वाहतूक
भंडारा जिल्ह्यातील रेतीघाट लिलाव २०१७-१८ अंतर्गत जिल्हयातील २९ रेतीघाटाचे लिलाव झाले आहे. वाळू उचल करुन वाहतूक करावयाचा कालावधीत ३० सप्टेंबर २०१८ आहे. यापैकी ११ रेतीघाटाचे परवाने बंद झाले असून १८ रेतीघाट मधून रेती वाहतूक सुरु आहे. सदर रेतीघाटधारक नदीपात्रालगतच्या मोकळ्या जागेवर अकृषिक परवानगी घेवून रेती साठवणूक केली आहे व सदर साठ्यावरुन रेती विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. नदीपात्र हे पाण्याखाली असल्याने थेट नदीपात्रातून उत्खनन करण्यास मनाई करण्यात आली आहे.