प्रकल्पात पाणी, शेती मात्र तहानलेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:31 AM2018-09-28T00:31:04+5:302018-09-28T00:31:59+5:30
शासन दरबारी ९२ टक्के सिंचन सुविधेची नोंद असलेल्या भंडारा जिल्ह्यात सध्या प्रकल्पाच्या पाण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. जिल्ह्यात झालेल्या ८१ टक्के पावसाने प्रकल्पांमध्ये पुरेसे पाणी आहे. परंतु शेतापर्यंत पाणीच पोहचले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासन दरबारी ९२ टक्के सिंचन सुविधेची नोंद असलेल्या भंडारा जिल्ह्यात सध्या प्रकल्पाच्या पाण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. जिल्ह्यात झालेल्या ८१ टक्के पावसाने प्रकल्पांमध्ये पुरेसे पाणी आहे. परंतु शेतापर्यंत पाणीच पोहचले नाही. सिंचन प्रकल्पाचे पाणी वेळेत मिळाले नाही तर धानासह इतर पिकही धोक्यात येण्याची शक्यता आहे. केवळ प्रशासनाच्या नियोजन शून्यतेने पाणी मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. एक दिवसाचा अपवाद वगळता महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या आशा प्रकल्पातील पाण्यावरच आहे.
भंडारा जिल्हा भात उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. भात पिकासाठी पावसाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. यासोबत वेळेत पाऊसही गरजेचा असतो. पंरतु आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली. अपवाद २१ सप्टेंबर रोजी झालेल्या एक दिवसाचा पावसाचा आहे. सध्या हलके धानपीक निसवण्याच्या तर उच्चप्रतीचे धानपीक गर्भावस्थातेत आहे. अशा स्थितीत पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात दोन लाख २५ हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात आली. त्यात एकट्या धानपिकाचे क्षेत्र एक लाख ७४ हजार हेक्टर आहे.
पावसाने दडी मारल्याने पीक धोक्यात आले आहे. अशा स्थितीत पाण्याची निंतात गरज आहे. परंतु पाऊस कोसळण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. परिणामी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या आशा सिंचन प्रकल्पावर आहे. जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. त्यात चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली, सोरणा या प्रकल्पात ५९.९४ टक्के जलसाठा आहे. तर ३१ लघु प्रकल्पात ६२.९० टक्के आणि मालगुजारी तलावात ६७.९९१ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यात सध्या सर्व प्रकल्पांमध्ये सरासरी ६२.९१ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाणी मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
मात्र अद्यापही सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले नाही. गावागावातील शेतकरी संतप्त झाले असून गत आठवड्यात तर शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. मात्र अद्यापही पाणी मिळत नाही. ९२ टक्के सिंचन सुविधा असल्याचा दावा करणारे प्रशासन प्रकल्पाचे पाणी सोडण्यात दिरंगाई करीत आहे. नियोजनाअभावी शेतकऱ्यांच्या बांध्यापर्यंत पाणी मिळत नाही. सिंचन प्रकल्पासारखीच अवस्था पाणी वापर संस्थाचीही झाली आहे. संस्थेतील अंतर्गत गटबाजी आणि पाटबंधारे विभागाच्या असहकार्य धोरणामुळे पाणी शेतापर्यंत पोहचत नाही.
प्रशासन प्रकल्पाचे पाणी उन्हाळ्यासाठी राखीव ठेवत आहे. परंतु सध्याच्या स्थितीत जर धान पिकाला पाणी मिळाले नाही तर संपूर्ण खरीप हंगाम हातचा जाण्याची भिती आहे. उन्हाळ्याऐवजी याप्रकल्पाचे पाणी आताच सोडण्याची मागणी होत आहे.
बघेडा तलाव चांदपूर मध्यम प्रकल्प, अंबागड तलाव, डोंगरगाव तलाव, नागठाणा तलाव, बावनथडी प्रकल्प, पेंच प्रकल्प यासारख्या प्रकल्पातून भात पिकांसाठी पाणी सोडण्याची गरज आहे. गत आठवड्यात आमदार चरण वाघमारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लाभ क्षेत्रातील शेतीसाठी पाणी सोडण्याचे निर्देश दिले होते. त्यांची अंमलबजावणी होऊन कालव्याद्वारे पाणी पुरवठा सुरु झाला आहे. परंतु अद्यापपर्यंत टेल पर्यंत पाणीच पोहचले नाही. बावनथडी प्रकल्पाच्या पाणी वाटपात हयगय करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा आमदार चरण वाघमारे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.
जिल्ह्यातील शेतकरी प्रकल्पाच्या पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. पाऊस नसल्याने सर्व आशा प्रकल्पाच्या पाण्यावर आहे. एकीकडे ९२ टक्के सिंचन क्षेत्राचा दावा करायचा आणि दुसरीकडे पीक वाळू द्यायचे अशी प्रशानाची भुमिका आहे. सध्या प्रकल्पात मुबलक पाणी असतांना प्रशासन केवळ वेळ काढू धोरण अवलंबत आहे. परिणामी धानपीक धोक्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ तोडगा काढला नाही तर शेतकऱ्यांसह आम्ही रस्त्यावर उतरु.
-नाना पटोले, अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस किसान सेल