भंडारा तालुक्यातील २५ गावांमध्ये जलसंकट, प्रस्तावित कृती आराखडा कागदावरच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 12:20 PM2023-06-03T12:20:16+5:302023-06-03T12:21:55+5:30
भंडारा तालुक्याला वैनगंगा ही नदी वेढा घालून जाते. परंतु नदी काठावरील काही गावेही तहानलेली असल्याचे दिसून येते.
भंडारा : जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, उन्हाळ्याच्या प्रारंभीच ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत कृती आराखडा तयार करण्यात येत असतो. मात्र भंडारा तालुक्यातील २५ गावांमध्ये या कृती आराखड्याची अंमलबजावणी प्रत्यक्षरित्या झाली नसल्याने या गावांत जलसंकट उद्भवले आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागअंतर्गत पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये उपाययोजना करण्यासंदर्भात कृती आराखडा तयार केला जातो. यामध्ये नळ योजना विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहीर किंवा कूपनलिका निर्माण करणे, विंधन विहिरीची दुरुस्ती करणे, तात्पुरती नळ योजना सुरुवात करणे, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण करणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे आदी कामांचा समावेश असतो. अति तीव्र पाणीटंचाई आहे तिथे टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याचे योजिले असते. त्या अंतर्गत प्रत्यक्षरित्या काम केले जाते.
भंडारा तालुक्यातील २५ गावांमध्ये जलसंकट बळावले आहे. भंडारा तालुक्याला वैनगंगा ही नदी वेढा घालून जाते. परंतु नदी काठावरील काही गावेही तहानलेली असल्याचे दिसून येते. अंतर्गत खेड्यांमध्ये पाण्याची टंचाई उद्भवली आहे. जिल्हा हा टँकरमुक्त म्हणून ओळखला जातो; परंतु भंडारा तालुक्यातील काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जातो. ग्रामीण पाणी पुरवठ्याची हद्द नसलेल्या भंडारा शहरातही काही कॉलनीमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे जिल्हा टँकर मुक्त आहे, ही बाब फक्त कागदोपत्री शोभणारी आहे.
१६ लाखांचा खर्च अपेक्षित
ग्रामीण पाणीपुरवठा विभागअंतर्गत भंडारा तालुक्यातील २५ गावांमध्ये प्रस्तावित योजनेअंतर्गत १६ लक्ष ८५ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित करण्यात आला आहे. यात विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये विशेषतः विंधन विहिरींची संख्या वाढविणे तसेच त्यांची दुरुस्ती करण्यावर भर देण्यात येणार आहे.
एकूण ८४ लाखांचा खर्च
उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, ३० जूनपर्यंत प्रस्तावित केलेल्या उपाययोजना पूर्ण करणे अपेक्षित असते. परंतु याला ग्रामपंचायत स्तरावरही पाठपुरावा केला जात नसल्याचे समजते. एकूण प्रस्तावित उपाय योजनेसाठी ८४ लक्ष २७ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची बाब ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या प्रस्तावित कृती आराखड्यावरून समजते.
टँकर मुक्तीची घोषणा नावापुरतीच
भंडारा जिल्हा हा टँकरमुक्त म्हणून ओळखला जातो. परंतु प्रत्यक्षात ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे, तिथे टँकरने पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यातून शहरेही सुटली नसल्याचे दिसून येते.