धरणातील पाणीच ठरू शकते टंचाईत उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:47 AM2019-05-18T00:47:36+5:302019-05-18T00:48:16+5:30
भंडारा जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून गावागावात पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. अशा स्थितीत प्रकल्पात असलेले पाणी नदीपात्रात सोडल्यास पाणीटंचाईवर मात होऊ शकते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित प्रकल्पांचे पाणी पिण्यासाठी राखीव असते, परंतु ते पाणी योग्यवेळी सोडले जात नसल्याने टंचाईचा सामना करावा लागतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : भंडारा जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून गावागावात पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. अशा स्थितीत प्रकल्पात असलेले पाणी नदीपात्रात सोडल्यास पाणीटंचाईवर मात होऊ शकते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित प्रकल्पांचे पाणी पिण्यासाठी राखीव असते, परंतु ते पाणी योग्यवेळी सोडले जात नसल्याने टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करताना धरणातून पाणी सोडण्याच्या नियोजनाचे लेखाशीर्ष असावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
भंडारा जिल्ह्यात गत तीन-चार वर्षांपासून सरासरीच्या २५ ते ३० टक्के पाऊस कमी होता. त्याचा परिणाम भुजल पातळीसह पिण्याचे पाणी आणि सिंचनावरही होत आहे. यंदा तर जिल्ह्यातील बहुतांश सर्व नद्या आटल्या आहेत. नदीपात्र वाळवंटासारखे भासत आहे. विहिरींनी तळ गाठला असून हातपंपावर हापसून दमल्यानंतर एक कळशी पाणी मिळते. पाण्याअभावी सिंचन धोक्यात आले आहे. अशा स्थितीत जलव्यवस्थापन आणि उन्हाळ्यात त्याचे योग्य वितरण आवश्यक झाले आहेत.
भंडारा जिल्ह्यात पावसाळ्यात चांगला पाऊस पडतो. परंतु हा पाऊस नद्यावाटे वाहून जातो. काही प्रकल्पात पाणी साठविले जाते. परंतु मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. जलसंधारणाचे कामेही कुचकामी ठरली आहे. त्यामुळे पाणी जमिनीत मुरत नाही. एप्रिल महिन्यातच जलपातळीत खालावून पाणीटंचाई निर्माण होते. निसर्गाचे पावसाळ्यातील पाणी वाहून जावू न देता ते धरणाच्या माध्यातून संग्रहित ठेवल्यास टंचाईत महत्त्वाचे ठरू शकते. पाण्याचे नैसर्गीक स्त्रोत योग्यरीत्या सांभाळून त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. सध्या पाणीटंचाईवर मात म्हणून ईटियाडोह, पेंच, बावनथडी धरणातून पाणी सोडले जाते. परंतू हे पाणी पाटबंधारे विभागाकडून विकत घ्यावे लागते. किंवा शासनाची शिफारस असावी लागते. या पाण्याच्या नियोजनाकरिता कृती आराखड्यात त्याचा समावेश केला तर उन्हाळ्याच्या दिवसात मोठा दिलासा मिळू शकतो.
भंडारा जिल्ह्यात नदी-नाल्यांच्या काठावर शंभर ते १२५ नळयोजना कार्यान्वीत आहे. यातील बहुतेक नळयोजना नदी-नाल्यावर अवलंबून आहे. नदीचे पाणी आटले की नळयोजना अखेरचा श्वास मोजायला लागतात. पुन्हा नवीन जलस्त्रोताकरिता कोट्यवधी रूपयांचा निधी तत्काळ खर्चाच्या नावाने मंजुर होतो. यातील बराचसा निधी नकारात्मक निधीने खर्च केला जातो. परिणामी पैशाचा दुरूपयोग होतो. हे टाळण्यासाठी मंत्रालयस्तरावरून अभ्यासाऐवजी पाणीटंचाई आराखडा अंतर्गत धरणाचे पाणी सोडल्याचा नियम लेखाशिर्ष झाल्यास अत्यल्पनिधीत नियमित पाणी उपलब्ध होवू शकतो. नदी-नाले पाणीदार होवून पशु-पक्षी आणि सिंचनाला पाणी तर मिळेल. मुख्य म्हणजे पाणीटंचाईची भटकंती थांबेल. लाखनी तालुक्याला गोसे व निम्नचुलबंदचे पाणी मिळाल्यास बाराही महिने पीक घेता येईल. धरणाचे कामे तत्परतेने पूर्ण केल्यास चुलबंद समोर तलाव, नाले तुडूंब भरतील.
याचा प्रत्येक खरीप हंगामात पालांदूर परिसरात अनुभवायला मिळाला. मºहेगाव नाल्याला गोसेचे पाणी आॅक्टोबर महिन्यात सोडण्यात आल्याने महिनाभर धानाला प्रवाहित करून शेतकऱ्यांसह नागरिकांनासुद्धा पाणी मिळाले.
उपसा सिंचन ठरू शकते जीवनदायी
पागोरा, नेरला उपसा सिंचनचे पाणी चुलबंदसह नाल्यात सोडण्याचा प्रयोग करण्यात आला. मांगलीबांध, मचारणा, जेवनाळा, कवळी खैरी या भागात त्याचा प्रत्येय आला. १२ पंपापैकी तीन पंपानी पाणी उपसा करून एका पाण्याने जाणारी शेती वाचली. याचाच संदर्भ लक्षात घेवून जिल्ह्यातील इतरही धरणाचे पाणी टंचाईत आराखड्यात समाविष्ट करून सोडल्यास मोठा दिलासा मिळू शकतो.