पाण्याची पातळी दोन मिटरने खालावली
By admin | Published: April 21, 2015 12:22 AM2015-04-21T00:22:37+5:302015-04-21T00:22:37+5:30
भूजलाच्या स्थिर पाण्याच्या पातळीचा अभ्यास करण्यात आला.
प्रशांत देसाई भंडारा
भूजलाच्या स्थिर पाण्याच्या पातळीचा अभ्यास करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी २५.०२ टक्के कमी पर्जन्यमान झाले. यात २५ पाणलोट क्षेत्रातील ७४ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले आहे. यातील ५१ विहिरींच्या पाण्याच्या पातळीत दोन मिटरची घट आढळून आल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. १५ जूनपर्यंत ६६ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता असल्याचा धक्कादायक अहवाल भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने शासनाला सादर केला आहे.
मार्च महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात उष्णतामान वेगाने वाढत आहे. आगामी तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या निरीक्षणानुसार जिल्ह्यातील नऊ लघू पाणलोट विहिरींच्या पातळीत एक ते दोन मीटरने पाणी पातळी खालावली असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. भूजलाच्या स्थिर पाण्याच्या पातळीचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने जिल्ह्याची २५ पाणलोट क्षेत्रात विभागणी केली. पाणलोट क्षेत्रातील उतारानुसार प्रत्येक पाणलोट क्षेत्र तीन भागात अनुक्रमे रनआॅफ झोन, रिचार्ज झोन आणि स्टोरेज झोन मध्ये विभागण्यात आला. या प्रत्येक झोनमध्ये एक अशा ७४ निरीक्षण विहिरी निश्चित करण्यात आल्या असून स्थित पाण्याच्या पातळीची वर्षातून चार वेळेस (जानेवारी, मार्च, मे व आॅक्टोंबर) मोजमाप करून नोंद घेण्यात आली. मागील पाच वर्षाच्या सरासरी स्थिर पाण्याच्या पातळीसोबत तुलनात्मक अभ्यास मार्च २०१५ मध्ये करण्यात आला.
जिल्ह्यात सरासरी १३३०.२१ मिमी पाऊस पडायला हवा. मात्र, जून ते मार्चपर्यंत ९९७.३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ३३२.८३ मिमी पाऊस कमी पडला आहे.
वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी शासनाला सादर केलेल्या अहवालातून काही धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत.
यात, जिल्ह्यात सामान्य मान्सून पर्जन्यमानाच्या तुलनेत जून २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत २५.०२ टक्के कमी पर्जन्यमान झाले आहे. सातही तालुक्यात सामान्य मान्सून पर्जन्यमानापेक्षा कमी झालेला आहे. ७४ निरीक्षण विहिरीपैंकी ५१ विहिरीमध्ये पाण्याची पातळीत घट आढळून आलेली आहे. तर २३ निरीक्षण विहिरींमध्ये पातळीत वाढ आलेली आहे. नऊ लघू पाणलोट क्षेत्रातील निरीक्षण विहिरींच्या पातळीत एक ते दोन मीटर घट आढळून आलेली आहे. या पाणलोट क्षेत्रातील ६६ गावांमध्ये एप्रिल ते जून या कालावधीत पाणी टंचाई भासण्याचा गंभीर इशारा या अहवालातून दिला आहे.
सोबतच पर्जन्यमान कमी झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना पाण्याचा प्रवाह जास्त काळपर्यंत राहणार नाही. नद्यांच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शहरांच्या नळ योजनांना व प्रादेशीक नळ योजनांवर लक्ष ठेवावे. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद व महाराष्ट्र जिवन प्राधिकरण यांच्या प्रगतीपथावरील योजना प्राधान्याने पूर्ण कराव्या.
हातपंपाची पाईपलाईन वाढविणे व कामे पूर्ण कराव्या, रेती उपस्याकरिता शिफारस केलेल्या रेती घाटांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणावरून रेतीचा उपसा करू देऊ नये, अशा सुचना या अहवालातून देण्यात आलेल्या आहेत.
पाणलोट क्षेत्रातील प्रातिनिधिक तीन विहिरींचा समावेश करण्यात आला आहे. माथा ते पायथा अशी पाण्याची पातळी मोजण्यात येते. १९७३ पासून ही पद्धत अविरत सुरू आहे. विहिरींची संख्या वाढली आहे. मागील दोन महिन्यात भूगर्भातून बेसुमार पाणी उपसा सुरू असल्याने सरासरी पाणी पातळीत वेगाने घट झाली आहे. मागील आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे पाण्याच्या पातळीत समाधानकारक वाढ झाली आहे.
- विजय भुसारी
वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा भंडारा.