कोरड्या विहिरीतून पाण्याचा उपसा

By Admin | Published: May 14, 2017 12:19 AM2017-05-14T00:19:52+5:302017-05-14T00:19:52+5:30

शीर्षक वाचून आश्चर्यात पडलात ना! मात्र हे खरे असून सत्यात घडलेली बाब आहे.

Water litter from dry wells | कोरड्या विहिरीतून पाण्याचा उपसा

कोरड्या विहिरीतून पाण्याचा उपसा

googlenewsNext

लोकमत शुभवर्तमान : मऱ्हेगावचे सरपंच बेंदवार यांच्या प्रयत्नाला यश
मुखरू बागडे । लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : शीर्षक वाचून आश्चर्यात पडलात ना! मात्र हे खरे असून सत्यात घडलेली बाब आहे. लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील कोरड्या विहिरीतून जलसंचय करण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरला असून ग्रामस्थांना भेडसावणारी पाण्याची चिंता यातून मिटली आहे. दुर्लक्षित ठरलेल्या विहिरीतून पाण्याचा नवा जलस्त्रोत शोधणे हा नवलाईचा विषय ठरला आहे.
‘रगडता वाळूचे कण, तेलही गळे’ या म्हणीला तंतोतंत जुळणारे कर्तृत्व मऱ्हेगाव येथे सत्यात उतरविण्यात आले. मऱ्हेगाव या जेमतेम १५०० लोकवस्तीचे हे गाव नवीन व जुनी अशा दोन वस्त्यांमध्ये विभागली आहे. या गावातील दोनही विहिरी मार्च, एप्रिल दरम्यानच कोरड्या ठाक पडल्याने ग्रामस्थांना पाण्याची चणचण भासत आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी शेतशिवारातील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. दोन्ही वस्त्यांमिळून एकमेव हातपंप असून तोही सध्या कामात नाही. त्यामुळे पाण्यांसाठी येथील आया-बहिणींची होणारी कुचंबना व वेळप्रसंगी महिलांमध्ये होणारे भांडण, तंटे. ही बाब लक्षात घेवून येथील सरपंच श्यामा बेंदवार यांनी गावातील एका सार्वजनिक विहिरीत जलस्त्रोत आटल्याने आता केवळ वाळूच दिसते. मऱ्हेगाव हे गाव चुलबंद नदीच्या काठावर असल्याने या नदीलगतच्या गावांमधील विहिरींमध्ये वाळूचे थर दिसून येते.
अशा वाळवंट प्रदेश सारख्या दिसणाऱ्या या गावातील सरपंच बेंदवार यांनी गावातील पाणीटंचाईची झळ बघविली गेली नाही. त्यामुळे त्यांनी गावातील युवांना हाताशी धरून विहिरीतील वाळूत लोखंडी पाईप टाकला. त्यावर मोटारपंप बसवून पाण्याचा उपसा करण्याचा प्रयत्न केला. तीन तासाच्या प्रयत्नानंतर जलस्त्रोत सापडला. आज सकाळी या विहिरीवर पाणी भरणाऱ्यांची मोठी गर्दी उसळली. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद झळकत होता.

असा केला प्रयत्न
४० फूट खोल विहिरीतील जलस्त्रोत आटला. त्यामुळे एप्रिल महिन्यापासूनच विहिरी कोरड्या झाल्या असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरू झाली. ही गंभीर समस्या दिसून आल्याने बेंदवार यांनी विहिरीत १५ फूट लोखंडी पाईप वाळूत खोलवर खुपसला. त्यावर फिल्टर पंप लावून पाणी ओढले व क्षणात सर्वांचे चेहरे आनंदी झाले. ही किमया मोटरपंप सुरू केल्याने हवेच्या दाबामुळे जमिनीत खोलवर असलेले पाणी बाहेर फेकू लागले. गावकऱ्यांसाठी ही किमया एका आश्चर्यापलीकडची ठरली आहे.

चुलबंद नदीकाठावरील गावांमध्ये रेतीच्या अमाप उपशामुळे भुजल स्त्रोत कमी होत आहे. प्रशासनाने कारवाई न केल्यामुळे ग्रामस्थांपुढे पाण्याची समस्या आहे. ग्रामस्थांनी केलेल्या एकजुटीच्या प्रयत्नातून पाण्याचा नवा स्त्रोत शोधण्यात यश आले
- श्यामा बेंदवार,
सरपंच मऱ्हेगाव.

Web Title: Water litter from dry wells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.