लोहारा येथे पाण्यासाठी हाहाकार

By admin | Published: April 10, 2017 12:37 AM2017-04-10T00:37:13+5:302017-04-10T00:37:13+5:30

तुमसर तालुक्यातील लोहारा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे.

Water lohara here | लोहारा येथे पाण्यासाठी हाहाकार

लोहारा येथे पाण्यासाठी हाहाकार

Next

प्रशासन सुस्त : उपाययोजना शून्य, महिला काढणार घागरमोर्चा, गावातील विहिरी पडल्या कोरड्या
रमेश लेदे  जांब (लोहारा)
तुमसर तालुक्यातील लोहारा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. परिणामी महिलांमध्ये असंतोष पसरला आहे. पाण्याची पातळी खोल गेल्याने लोहारा येथील संपूर्ण विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत. पाण्याची पातळी खोल गेल्याने पाण्यासाठी दूरवर जावे लागत आहे. भर उन्हामध्ये शेतातील विहिरीचे पाणी आणावे लागत आहे. नळ योजनेकरिता गावामध्ये दोन बोअरवेल आहेत. त्यापैकी एक बोअरवेल मार्च महिन्यापूर्वीच पाण्याअभावी बंद पडली तर दुसरी बोअरवेल येत्या दोन ते चार दिवसात बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
लोहारा येथे सन २०११ ते २०१२ पासून सतत पाणीटंचाई भासत आहे. पाणी टंचाईवर पाहिजे त्या प्रमाणात प्रशासनाकडून उपाययोजना केली गेली नाही. मार्च महिन्यापासून पाण्याची भीषण टंचाई भासत आहे. मे आणि जून महिना शिल्लक आहे. लोहारा गावाची लोकसंख्या दोन हजाराच्या वर असून गावामध्ये तीन सार्वजनिक विहिरी आहेत. पण त्या सन २०११ पासून कोरड्या पडल्या आहेत. बोअरवेलची संख्या आठ आहे. मात्र दोन वगळता पूर्ण पाण्याची पातळी खोल गेल्याने त्या बंद पडल्या आहेत. नळ योजनेकरिता दोन बोअर मारण्यात आल्या होत्या. एक पूर्वीच बंद पडली तर दुसरी झटके देत आहे.गावकऱ्यांना पिण्याचा पाणी सुद्धा पुरेसा मिळत नाही. लोहारा येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीच्या जलकुंभामध्ये पाणी पुरवठा करणारी दोन्ही बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे गावात पिण्याचे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तरीपण गावालगत गाव फिडरवर असलेल्या बोअरवेल कृषी फिडरवर करण्यात यावे.
जेणेकरून शेतीसाठी होणारा निरंतर पाणी उपसा थांबल्यास काही प्रमाणात पाणी टंचाईवर मात करता येवू शकते. या संदर्भात मागील वर्षापासून गाव फिडर व कृषी फिडर वेगवेगळे करण्यासाठी खांब उभे केले. पण "तार" अजूनपर्यंत लावण्यात आले नसून त्यांचे काम मागील वर्षापासून कासवगतीने असल्याची तक्रार सरपंच शामराव ठाकरे व उपसरपंच गुलाब पिलारे यांनी केली आहे. गावामध्ये ग्रामपंचायतकडून सकाळपाळीमध्ये ७ ते ८ वाजता दरम्यान नळ सुरु करतेवेळी गावातील १ तासाकरिता विद्युत पुरवठा ताबडतोब खंडीत करण्यात यावा. जेणेकरून टिल्लू पंपाद्वारे अवैध पाणी उपसा करणाऱ्या नळ खातेदारांना पाणी उपसा करता येणार नाही. पाणी टंचाईवर मात करता येईल, असे ग्रामपंचायतमध्ये ठराव सर्वानुमते मंजूर करून शाखा अभियंता, विद्युत विभाग, आमदार चरण वाघमारे, तहसीलदार व खंडविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.
यावर लोकप्रतिनिधी व अधिकारी काय उपाययोजना करतात, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवून लोहारा येथील पाणी समस्या मिटविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. अन्यथा ग्रामपंचायत तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा महिलांनी दिला आहे.

Web Title: Water lohara here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.