मध्यम प्रकल्पांसह बारा प्रकल्पांत पाण्याचा ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:34 AM2019-04-19T00:34:19+5:302019-04-19T00:35:08+5:30
जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून विदर्भात ओळखला जातो. जवळपास ५ हजाराच्या जवळपास लहान मोठी तलावे आहेत. जिल्ह्यातील सर्वच तलाव कोरडी पडल्याने यंदा या जिल्ह्याला भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून विदर्भात ओळखला जातो. जवळपास ५ हजाराच्या जवळपास लहान मोठी तलावे आहेत. जिल्ह्यातील सर्वच तलाव कोरडी पडल्याने यंदा या जिल्ह्याला भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यातील नदी, नाल्यासह विहीरीही पूर्णत: आटल्या आहेत. पाणी हे जीवन असून, त्याचा वापर योग्य पध्दतीने होण्याची नितांत गरज आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत गाव असो वा शहर सर्वत्रच पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची उपलब्धता कमी होते. त्यामुळे पाण्याचा होणारा दुरूपयोग टाळून काटकसरीने पाण्याचा वापर करण्याची गरज असल्याचे आवाहन सुज्ञ नागरिकांमधून होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात गत काही दिवसापासून नागरिकांना कडक उन्हाचा फटका बसत आहे.
उन्हाची तीव्रता वाढतच चालली असून प्रकल्पातील पाणीसाठा खालवत चालला आहे. विहिरी, नदया कोरड्याठण पडत आहेत. यामुळे जिल्ह्यावर भीषण पाणी टंचाईचे संकट घोंगावत आहे.
पाण्याची भीषण टंचाई असतानाही पाणीपुरवठा विभागाला याचे काही सोयरसुतक वाटत नसल्यामुळे जनतेची पाण्यासाठी पायपीट सुरूच आहे. काही गावांमध्ये मागासवर्गीय वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. यावर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला असला तरी नदी, नाले, बंधारे, धरण हिवाळयामध्येच कोरडी पडली असून काही गावांमधील नागरिकांना दोन ते तीन किमी अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून पाणलोट क्षेत्रविकास व मातीबांध, सिमेंट प्लग आदी उपाययोजना केल्यात. परंतु, या सर्व गोष्टींतून पाणी अडविण्याऐवजी शासनाचा निधी जिरविण्याचे काम झाल्यामुळे उपायोजना केवळ कागदापुरत्याच मयार्दीत आहेत. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पाच्या पाणी पातळीत घट झाली असून, गावातील हातपंप, विहरी कोरड्या पडत आहेत.
नळ योजनेला अखेरची घरघर
वषार्नूवषार्ची पाणीसमस्या निकाली काढण्यासाठी शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करून उभ्या करण्यात आलेल्या जिल्हयातील पाणीपुरवठा योजना पुरेशा नियोजनाअभावी ओस पडल्या आहेत. पाणीपुरवढा योजनेमुळे गावातील पाणी समस्येचे निवारण होईल, अशी अपेक्षा टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना होती. मात्र, नागरिकांची समस्या निवारण्याऐवजी त्या आशेवर त्यांच्या नरडा पूर्णता: कोरडा झाला आहे. अनेक गावात पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. पाणीसमस्या निवारण्यासाठी उभारलेल्या बहुतांश प्रादेशिक पाणीपुरवठा नळ योजनेला अखेरची घरघर लागलेली आहे.