सदोष नालीबांधकामामुळे रस्त्यावर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:23 AM2021-06-29T04:23:59+5:302021-06-29T04:23:59+5:30
समर्थ महाविद्यालयासमोरील रस्ता : मुरमाडी (सावरी) येथील घटना लाखनी : तालुक्यातील मुरमाडी (सावरी) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ...
समर्थ महाविद्यालयासमोरील रस्ता : मुरमाडी (सावरी) येथील घटना
लाखनी : तालुक्यातील मुरमाडी (सावरी) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्र.१ मधील समर्थ नगर येथे राष्ट्रीय महामार्ग ते समर्थ महाविद्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर पावसाचे पाणी थांबत असल्याने जनतेला त्रास सहन करावा लागतो आहे.
मागील वर्षी मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधा अंतर्गत विशेष अनुदान असून बौद्ध विहार ते समर्थ महाविद्यालयापर्यंत सिमेंट नाली बांधकाम करण्यात आले आहे. सिमेंट नाली बंदिस्त असलेली तयार केली असली तरी पाण्याचा निचरा होत नाही रस्त्यावर पाणी साचत असल्याने रस्ता चिखलमय झालेला आहे. ग्रामपंचायतने ५ लक्ष रुपये खर्च करून नाली बांधकाम केले. परंतु नाली बांधकामाचा उपयोग पाण्याचा निचरा करण्यासाठी होत नाही.
वॉर्ड क्र.१ चे ग्रामपंचायत सदस्य जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील लोक संख्येने मोठी असलेली मुरमाडी ग्रामपंचायत आहे. लाखनी शहराला मुरमाडी (सावरी) जोडून असल्याने मुरमाडीची जनसंख्या व वस्ती वाढत आहे. नागरी ग्रामपंचायत असल्याने कर आकारणी मोठ्या प्रमाणात होत असते. परंतु जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत अपयशी ठरली आहे.