विहिरी कोरड्या होऊ लागल्याने पाणी टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:01 AM2018-01-18T00:01:43+5:302018-01-18T00:02:10+5:30
आॅनलाईन लोकमत
केशोरी : गावालगत असलेल्या जमिनीवर शेतकऱ्यांनी रब्बी व उन्हाळी धानपीक लागवडीची सुरुवात केली आहे. त्यामुळे गावातील विहिरी झपाट्याने कोरड्या पडू लागल्या आहेत. या प्रकारामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याची समस्या उग्ररुप धारण करण्याची शक्यता आहे. यासाठी कृषी विभाग व ग्रामपंचायतने गावालगतच्या शेतकºयांनी धान पिकाची लागवड करू नये, असा आदेश शेतकºयांना देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पिकाचे पºहे टाकले आहेत. गावालगत शेतजमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांनी बोअरद्वारे २४ तास मोटार चालू ठेवल्याने गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. उन्हाळा सुरू होण्यास अजून दोन महिने शिल्लक असताना विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत.
मार्च, एप्रिल, मे व जून या चार महिन्यांपर्यंत गावातील विहिरींचे पाणी नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. उन्हाळा चालू होण्यापूर्वीच विहिरीतील पाणी पातळी ७० टक्केपर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात विहिरींची काय अवस्था होईल, याची नागरिकांना चिंता वाटू लागली आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली तर सर्व ग्रामस्थांना मोठा त्रास होईल व पाण्यासाठी उन्हातान्हात त्यांना भटकंती करावी लागेल. याची दक्षता आताच घेतलेली बरी, असे नागरिकांचे मत आहे. त्यासाठी उन्हाळी पीक न घेण्याचे आदेश देण्याची गरज आहे. याप्रकरणी कृषी विभाग आणि ग्रामपंचायतीने विशेष लक्ष देऊन उन्हाळी पीक घेवू नये, असे आदेश शेतकºयांना देण्यात यावे. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.