पाणीटंचाईच्या उपाययोजना झाल्या प्रभावहीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:28 AM2019-05-16T00:28:07+5:302019-05-16T00:28:36+5:30
तलावाच्या जिल्ह्यात कधी नव्हे ते यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावागावांतील तलाव तळाला गेले असून जलस्रोत आटले आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने कृती आराखडा मंजूर केला. मात्र या आराखड्यातील उपाययोजना प्रभावहीन दिसत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तलावाच्या जिल्ह्यात कधी नव्हे ते यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावागावांतील तलाव तळाला गेले असून जलस्रोत आटले आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने कृती आराखडा मंजूर केला. मात्र या आराखड्यातील उपाययोजना प्रभावहीन दिसत आहेत. त्यामुळे पहाटेपासूनच माय माऊल्यांना डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन भटकंती करावी लागत आहे.
भंडारा जिल्ह्यात तेराशेच्या वर तलाव आणि विस्तीर्ण पात्र असलेल्या नद्या आहेत. असे असतानाही यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाई निर्माण झाली. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार केला. ६७९ गावे पाणीटंचाईच्या छायेत आहेत. १५५५ उपाययोजनांसाठी १२ कोटी ५८ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यात नवीन विंधन विहिरी घेणे, नळयोजनांची विशेष दुरुस्ती, विहिर खोलीकरण व गाळ काढण्याचा समावेश आहे. आतापर्यंत केवळ विंधन विहिरी खोदण्यावरच खर्च करण्यात आला. इतर योजनांकडे मात्र सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गावागावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील जलस्त्रोत तळाला गेले आहेत. नदीचे पात्र वाळवंटासारखे भासत आहे. हातपंपाला तासन्तास हापसल्यानंतर कळशीभर पाणी मिळते. त्यामुळे अनेकांना रोज मजुरी सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
प्रकल्पाचे पाणी सोडण्याची प्रतीक्षा
जिल्ह्यात मोठे आणि मध्यम प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मे महिन्यात या प्रकल्पाचे पाणी सोडले जाणार असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. परंतु अद्यापर्यंत प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडले नाही. पेंच, बावनथडी, इडियाडोह या प्रकल्पातून पाणी सोडले जाणार होते. परंतु अद्यापही पाणी सोडण्यात आले नाही. या प्रकल्पाचे पाणी सोडल्यास नदी तीरावरील गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल आणि त्यातून पाणीटंचाई संपुष्टात येईल.