पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:39 AM2021-08-28T04:39:52+5:302021-08-28T04:39:52+5:30
जवाहर गेटबाहेरील टेकडीवर सौंदर्यीकरणाचे काम सुरू असून हे काम करीत असताना शहरात पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइपलाइन मागील आठवड्यात फुटली ...
जवाहर गेटबाहेरील टेकडीवर सौंदर्यीकरणाचे काम सुरू असून हे काम करीत असताना शहरात पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइपलाइन मागील आठवड्यात फुटली असून, यातून लाखो लिटर शुद्ध पाणी रस्त्यावर वाहून जात असून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. त्यामुळे शहरात अनियमित पाणीपुरवठा होत असून, पुढील दोन दिवस शहरात पाणीपुरवठा होणार नसल्याची मुनादी नगर परिषदेकडून शहरात देण्यात आली आहे.
लाखो लिटर शुद्ध पाणी रस्त्यावर वाहत असल्याने व फुटलेल्या पाइपलाइनचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे नागरिकांत असंतोष असून फुटलेली पाइपलाइन जलदगतीने दुरुस्ती करून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पवनीच्या वतीने यापूर्वी निवेदन देण्यात आले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा आज दिनांक २७ ऑगस्टला निवेदन देण्यात आले असून शहरातील पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष यादव भोगे यांनी दिला आहे.