जीर्ण जलवाहिनीतून पाणीपुरवठा
By admin | Published: January 3, 2016 01:16 AM2016-01-03T01:16:32+5:302016-01-03T01:16:32+5:30
सेंदुरवाफा व साकोली या दोन गावांमध्ये पाणी पुरवठ्याची सुविधा व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे सन १९८४-८५ ला जलवाहिनी घालण्यात आली.
संजय साठवणे साकोली
सेंदुरवाफा व साकोली या दोन गावांमध्ये पाणी पुरवठ्याची सुविधा व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे सन १९८४-८५ ला जलवाहिनी घालण्यात आली. या जलवाहिनीची कालमर्यादा २२ वर्षे ठरविण्यात आली. आता ३० वर्षांचा कालावधी लोटूनही त्याच जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरु आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दुसरी पाणीपुरवठा योजना तयार आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षामुळे ही योजना एक वर्षापासून बंद अवस्थेत आहे. लोकप्रतिनिधींची उदासिनता साकोलीवासीयांना भोवत आहे. शुध्द पाणीपुरवठा करणारी योजना तयार असुनही नागरिकांना पाण्यापासुन वंचित राहावे लागत आहे. साकोली ग्रामपंचायतचे रुपांतर आता नगरपंचायतमध्ये झाले असून लवकरच साकोली व सेंदुरवाफा या दोन्ही गाव मिळून नगरपरिषद घोषित होणार आहे. ३० वर्षांपूर्वी साकोली व सेंदुरवाफा या दोन्ही गावासाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाईपलाईन टाकून चुलबंद नदीवर पंपहाऊस तयार करण्यात आले. यातून पाणी एम. बी. पटेल महाविद्यालयाच्या मागील पहाडीवर बांधण्यात आलेल्या टाकीत सोडले जात होते. तिथुन हे पाणी साकोली व सेंदूरवाफा या दोन्ही गावाला सोडले जात होते. आठ वर्षापूर्वी महामार्ग चौपदरीकरणाचे कामात सेंदुरवाफा येथे जाणारी पाईपलाईन अस्ताव्यस्त झाली. तेव्हापासुन येथे पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. गणेश वॉर्ड व तलाव वॉर्ड येथील पाणीपुरवठा सुरु असून उर्वरित ठिकाणचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे साकोली येथे पाणीटंचाई आहे. या योजनेच्या जलवाहिनी कलावधीची मुदत संपली तरी अधिकारी कसे काय शांत बसले असा प्रश्न आहे. कालांतराने शासनाने पुन्हा जीवन प्राधिकरण विभागामार्फत साकोली व लाखनी तालुक्यातील १९ गावांना शुध्द पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन योजना तयार केली. ही पाणीपुरवठा योजना मागील पाच वर्षापासून तयार असून जीवन प्राधिकरणतर्फे ही योजना वर्षभर सुरळीत चालविण्यात आली. यानंतर ही योजना जिल्हा परिषदेने ताब्यात घेऊन पाणीपुरवठा करणे होते. मात्र योजना हस्तांतरित झालेली नाही. त्यामुळे प्राधिकरणने एक वर्षापुर्वी ही योजना गुंडाळली असून परिणामी पाणी पुरवठा ठप्प झाला आहे.