पाणीपुरवठ्याची कामे नियमबाह्य?
By admin | Published: October 20, 2016 12:30 AM2016-10-20T00:30:59+5:302016-10-20T00:30:59+5:30
पाणी जीवन आहे, परंतु पाणीपुरवठा योजना राबविणाऱ्या यंत्रणा नियमानुसार कामे करीत नसल्याने योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
देव्हाडी येथील प्रकार : ग्रामपंचायत सदस्यांनी केली तक्रार
तुमसर : पाणी जीवन आहे, परंतु पाणीपुरवठा योजना राबविणाऱ्या यंत्रणा नियमानुसार कामे करीत नसल्याने योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. देव्हाडी येथे चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कामे सुरु करण्यात आली. जलवाहिन्या केवळ अर्धा ते एक फुट खोदलेल्या नालीत ठेवण्यात आल्या आहेत. शासकीय इस्टीमेटमध्ये ते तीन फुटाचे केवळ अर्धा ते एक फुट खोदलेल्या नालीत ठेवण्यात आले. इस्टीमेटमध्ये ते तीन फुटाचे आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार केल्यावर त्यांनी भेट देण्याचा सोपस्कार पार पाडला हे विशेष.
तुमसर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून देव्हाडी ग्रामपंचायतचे नाव आहे. येथे सुमारे २५ वर्षापूर्वी ग्रामपंचायतीने स्वत:ची पाणीपुरवठा योजना सुरु केली होती. गाव शिवारात विहिरीतून संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करण्यात येतो. मुख्य व इतर जलवाहिण्या जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने काही जलवाहिन्या बदलविण्याचा ठराव घेतला. ४ लक्ष ५७ हजार ५६८ व ४ लक्ष ९९ हजार १७५ किमतीच्या दोन जलवाहिन्या नवीन घालण्याचा ठराव मंजूर केला. रितसर पंचायत समितीमधील पाणीपुरवठा योजना कार्यालयाकडे तो पाठविण्यात आला. पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाने कामाचे करारनामे तयार केले.
या इस्टीमेटमध्ये जलवाहिन्यात ३ फूट नाली खोदल्याचे नमूद केले आहे. परंतु येथे मात्र कुठे अर्धा फुट, कुठे एक फुट तर काही ठिकाणी तीन फुट नाली तयार केली. नियमानुसार कामे होत नाही अशी तक्रार माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य शैलेश ठाकरे, गुड्डू मसरके यांनी पाणीपुरवठा विभागाकडे केली. तीन दिवसापूर्वी संबंधित विभागाचे दोन अभियंत्यांनी पाहणी केली. ग्रामपंचायतीला केलेली कामे पुन्हा खोदकाम करून जलवाहिण्या पाहण्याकरिता खोदण्याचे निर्देश दिले. सोमवारी येणार असल्याचे सांगितले, परंतु संबंधित अभियंते आले नाही.
ग्रामपंचायतीला प्राप्त निधीतून ही कामे होत असल्याने या संपूर्ण कामावर ग्रामपंचायतीचे नियंत्रण आहे. पाणीपुरवठा योजनेची संबंधित कामे सुरु करण्यापूर्वी ग्रामपंचायतीने संबंधित प्लास्टीक जलवाहिन्या तथा खोदकाम सुरु असताना अभियंत्यांना माहिती देण्याचा नियम आहे. कामे सुरु असताना कंत्राटदार नियमानुसार काम करीत आहे, हे पाहण्याकरिता (अभियंत्यांना कळविण्याची गरज होती. येथे कर्तव्यात कसूर करण्यात आल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे.
पंचायत समिती कार्यालय तुमसर ते देव्हाडीचे अंतर केवळ पाच कि.मी. आहे. केवळ इस्टीमेट तयार करणे व त्याचे मोजमाप करून देणे एवढेच काम या विभागाचे आहे का? हा प्रश्न आहे. तक्रार केल्यावरही गंभीर दखल येथे घेण्यात येत नाही. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी लेखी तक्रार दिल्यावरही दखल घेण्यात आलेली नाही. (तालुका प्रतिनिधी)
पाणीपुरवठा योजनेची कामे संबंधित पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी येऊन पाहतात. नियमबाह्य कामे झाली असतील तर त्यांचे बिल मिळणार नाही.
- बी.के. बावनकुळे, ग्रामविकास अधिकारी, देव्हाडी
चार दिवसापूर्वी जलवाहिन्या जाऊन बघितल्या. नाली खोदकाम नियमानुसार आहे किंवा नाही हे पाहण्याकरिता नाली उकरुन काढण्यास सांगण्यात आले. बैठकीत व्यस्त असल्याने येता आले नाही, परंतु पुन्हा भेट देऊन संपूर्ण पाहणी करण्यात येईल.
- धनंजय बावनकर, उपविभागीय अभियंता, पाणीपुरवठा विभाग, तुमसर