भंडारा जिल्ह्यात गणरायाला पाण्याचा विळखा; रांजी येथील मंदिरात शिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 01:56 PM2020-08-29T13:56:26+5:302020-08-29T13:56:49+5:30
पवनी तालुक्यातील रांजी गणेश मंदिरात पाणी शिरले आहे. गणरायाची मूर्ती पाण्यात अर्धी बुडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे उगडले असून पवनी तालुक्यातील रांजी गणेश मंदिरात पाणी शिरले आहे. गणरायाची मूर्ती पाण्यात अर्धी बुडाली आहे.
याआधी या मंदिरात १९९४ च्या महापुराचे पाणी शिरल्याची आठवण गावकरी सागंतात. या भागातील दिवान घाट व वैजेश्वर घाट हेही पाण्याखाली गेले आहेत.
जिल्ह्यात गुरूवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून शुक्रवारीही क्षणभराची उसंत न घेता पाऊस बरसत होता. या पावसाने जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला असून तलाव तुडुंब भरले आहे. आठ दिवसापुर्वी गुरूवारीच जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली होती. आता पुन्हा संततधार पाऊस बरसत असल्याने धान पीक धोक्यात आले आहे.
जिल्ह्यात गुरूवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. रात्रभर संततधार पाऊस बरसत होता. शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात ४३.४ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस साकोली तालुक्यात ९७ मिमी झाला असून येथे अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. तुमसर तालुक्यात ४५.२ मिमी, लाखांदूर ४४.५ मिमी, लाखनी ४२.८ मिमी, मोहाडी ३८.३ मिमी आणि भंडारा तालुक्यात २१.१ मिमी पावसाची नोंद झाली. १ जून ते २८ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात १०२४.८ मिमी पावसाची नोंद झाली असून प्रत्यक्ष पडणाऱ्या सरासरी पावसाच्या १०१ टक्के आहे.