चुलबंद नदीत पाण्याचा ठणठणाट
By admin | Published: June 26, 2016 12:25 AM2016-06-26T00:25:51+5:302016-06-26T00:25:51+5:30
तालुक्यातील नागरिकांसाठी जीवनदायिनी असणाऱ्या चुलबंद नदीचे पात्र पुर्णपणे कोरडे पडल्याने नागरीकांसह जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे.
साकोली तालुक्यात पाणीटंचाई : नागरिकांसह जनावरांनाही फटका
संजय साठवणे साकोली
तालुक्यातील नागरिकांसाठी जीवनदायिनी असणाऱ्या चुलबंद नदीचे पात्र पुर्णपणे कोरडे पडल्याने नागरीकांसह जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. चुलबंद नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेली जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठा योजनाही ठप्प असून निम्न चुलबंद प्रकल्प शोभेची वस्तु ठरला आहे.
अत्यल्प पावसामुळे चुलबंदच्या पात्रातील पाणी आटले. त्यामुळे परिसरात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परिसरातील बहुतांश भागातील नळयोजना या विहीरीवर आहेत. या विहिरी ५० ते ६० फुट खोल आहेत. मात्र गावात शेतकऱ्याच्या शेतातील बोरवेल यापेक्षाही खोल आहेत. त्यामुळे नळयोजनेच्या विहिरी खोल पडल्या. परिणामी लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. ही विदारक स्थिती तालुक्याची आहे.
जीवन प्राधिकरणाची योजना ठप्प
साकोली व लाखनी तालुक्यातील १९ गावांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी जीवन प्राधिकरणातर्फे साकोली येथे पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली. या पाणी पुरवठा योजनेसाठी पाणी चुलबंद प्रकल्पातून घेण्यात येणार होते. मात्र प्रकल्पाचे काम रखडल्याने व पाणीसाठा अत्यल्प असल्याने ही योजना पुर्णपणे ठप्प पडली आहे.
लोकप्रतिनिधींची उदासिनता
निम्न चुलबंद प्रकल्पाचे काम मागील १५ वर्षांपासून सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी दिवास्वप्न ठरलेला हा प्रकल्प लवकर पुर्ण होईल, शेतीला सिंचनाची सोय होईल, या आशेवर शेतकरी असला तरी दिवास्वप्न ठरलेल्या या प्रकल्पाकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष आहे. निम्न चुलबंद प्रकल्पाचे काम कासवगतीने होत आहे.