जलशुद्धीकरण केंद्र परिसरात पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 11:19 PM2018-05-21T23:19:40+5:302018-05-21T23:20:08+5:30
जल जीवन आहे. पाण्याचे महत्व अनन्यसाधारण असताना तुमसर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरात जलवाहिनी लिकेजमुळे शेकडो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.
मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : जल जीवन आहे. पाण्याचे महत्व अनन्यसाधारण असताना तुमसर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरात जलवाहिनी लिकेजमुळे शेकडो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. जलशुद्धीकरण परिसरात पाणी साचले आहे. साचल्या पाण्यात वृक्षांची कठडे, कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाड्या पडून आहेत. नवीन लोखंडी साहित्य मागील अनेक महिन्यापासून भंगारात पडल्यावजा आहेत. नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे.
तुमसर शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्या नेहरू शाळेजवळील जलशुद्धीकरण केंद्रात जलवाहिनी लिकेज झाली आहे. नगरपरिषदेचे कर्मचारी तांत्रिक बिघाड दूर करण्याचा निश्चितच प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांना यश आले नाही. जलशुद्धीकरण केंद्र परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. मागील चार ते पाच दिवसापासून पाण्याची नासाडी होत आहे. जुनी जलवाहिनी असल्याने लिकेज झाल्याचे समजते. दुसरीकडे उन्हाळा असल्याने नगरपरिषद प्रशासनाने शहरात पाणीपुरवठा करणे सुरु ठेवले आाहे.
पाणीपुरवठा बंद करून जलवाहिनी दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला तर शहरात पाण्याकरिता हाहा:कार होईल.
संतप्त नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा विचार करून पाणीपुरवठा सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
२८ मे रोजी लोकसभा पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे तुमसरकरांना नाराज करता येणार नाही. सर्व पदाधिकारी निवडणूक कामात व्यस्त आहेत. ग्राम पंचायत प्रशासनाचे कर्मचारीही शासकीय कामात व्यस्त आहेत. पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी लिकेजची कामे पाणीपुरवठा केल्यानंतर करणे सुरु आहे. परंतु लिकेज पूर्णत: बंद न झाल्याने पाणी लिकेजमधून वाहून जात आहे.
वृक्षांचेकठडे, घंटागाड्यांचीही अवस्था वाईट
तुमसर नगरपरिषदेने मोठ्या प्रमाणात शहरात वृक्षांची लागवड केली. त्यांच्या सुरक्षेकरिता लोखंडी कठडे लावले होते. जुने कठडे काढण्यात आले. नवीन लोखंडी कठडे तयार करण्यात आले. जुन्या कठड्याऐवजी नवीन कठडे अनेक ठिकाणी लावण्यात आले नाही. सध्या जुने व नवीन कठडे जलशुद्धीकरण केंद्रात पडून आहेत. कचरा उचलणाºया काही जुन्या व नवीन घंटागाड्या सुद्धा येथे पडून आहेत. जलशुद्धीकरण केंद्रात पाणी साचल्याने ते साहित्य निश्चितच खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील जलवाहिनी लिकेज असल्याने पाणी साचले आहे. दुरुस्तीची कामे सुरु आहेत. शहराचा पाणीपुरवठा बंद करून दुरुस्ती करता येत नाही. नागरिकांना असुविधा होईल. तांत्रिक बिघाड दूर केल्या जाईल. वृक्षांची कठडे व घंटागाड्या सुरक्षित स्थळी हलविण्यास सांगितले आहे.
-प्रदीप पडोळे, नगराध्यक्ष, तुमसर.