वैनगंगेच्या कोरड्या पात्रात पाणीच पाणी
By admin | Published: May 30, 2017 12:22 AM2017-05-30T00:22:32+5:302017-05-30T00:22:32+5:30
कवलेवाडा बॅरेजमधून कोरड्या वैनगंगेच्या पात्रात पाणी विसर्ग करण्यात आले. पाणी विसर्ग केल्याने ...
७० हजार नागरिकांना दिलासा : कवलेवाडा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : कवलेवाडा बॅरेजमधून कोरड्या वैनगंगेच्या पात्रात पाणी विसर्ग करण्यात आले. पाणी विसर्ग केल्याने तुमसर शहरासह २० ते २५ गावांतील ७० हजार नागरिकांची पाणी समस्या सुटण्यास मदत होणार आहे. प्रथमच कवलेवाडा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला हे विशेष. आ. चरण वाघमारे यांच्या प्रयत्नांना येथे यश आले.
तुमसर शहरासह तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. यापूर्वी बावनथडी प्रकल्पातून एका महिन्यापुर्वी धान पिकाकरिता पाण्याचा विसर्ग करण्यात आले होते. त्यानंतर तीव्र पाणीटंचाईवर मात करण्याकरीता बावनथडी प्रकल्पातून पाणी विसर्ग करण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु बावनथडी प्रकल्पात पाणीसाठी शिल्लक कमी असल्याची कारणे पुढे करण्यात आली.
बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्याची जबाबदारी व नियंत्रण मध्यप्रदेश शासनाकडे आहे. मध्यप्रदेश शासनाकडे आ. चरण वाघमारे यांनी पाठपुरावा केला होता. आ. वाघमारे यांनी नंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्याकरिता साकडे घातले. मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांचेशी भ्रमणध्वनीवर चर्चा केली. २३ मे रोजी बावनथडी धरणातून ८३ क्सुसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आले.
तीन दिवसानंतर हे पाणी कवलेवाडा बॅरेजमध्ये पोहोचले. कवलेवाडा बॅरेजमधून रविवारी सकाळी १० वाजता पाण्याचा विसर्ग करण्यात आले. माडगी येथील वैनगंगा पात्रात ते पाणी सोमवारी पहाटे ३ वाजता पोहोचले. नदीपात्रात सध्या पाणीच पाणी दिसत आहे. किमान आठवडाभर पाण्याचा अल्प प्रवाह कवलेवाडा बॅरेजमधून सोडला जाणार आहे. तुमसर शहराचा पाणीपुरवठा ठप्प होण्याच्या मार्गावर होता. नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, पाणीपुरवठा सभापती मेहताब सिंग ठाकूर, उपाध्यक्ष कांचन कोडवानी तथा इतर नगरसेवकांनी कवलेवाडा बॅरेजमधून पाणी सोडण्याकरिता आ. चरण वाघमारे यांना भेटून पाणी समस्या सांगितली होती.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले, जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे यांनी कवलेवाडा बॅरेजमधून पाणी विसर्ग करण्याकरीता जिल्हा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. पाणी प्रश्न पेटण्यापुर्वीच प्रशासनाने कवलेवाडा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग केला.