वाकाटक काळाची साक्ष देताहेत शिलाप्रकस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 11:22 PM2019-05-09T23:22:05+5:302019-05-09T23:22:51+5:30

वाकाटक राजेशाहीची, संस्कृतीची ओळख करून देणारे शिलाप्रकस्थ (डालमेंट्स) पवनी तालुक्यातील खैरी तेलोता पिंपळगाव येथे आहेत. अशाच प्रकारचे शिलाप्रकस्थ तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पाहुनगावजवळील जंगलातील भातसरा तलावाजवळ आहे.

Waxat | वाकाटक काळाची साक्ष देताहेत शिलाप्रकस्थ

वाकाटक काळाची साक्ष देताहेत शिलाप्रकस्थ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : वाकाटक राजेशाहीची, संस्कृतीची ओळख करून देणारे शिलाप्रकस्थ (डालमेंट्स) पवनी तालुक्यातील खैरी तेलोता पिंपळगाव येथे आहेत. अशाच प्रकारचे शिलाप्रकस्थ तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पाहुनगावजवळील जंगलातील भातसरा तलावाजवळ आहे. अनेक शतकापूर्वीचे हे प्राचीन ऐतिहासिक शिला प्रकस्थ उन्हा, पाऊस, वारा, वादळ यांचा सामना करीत वाकाटक काळाची साक्ष देत आजही उभे आहेत. या प्राचीन शिलाप्रकस्थांचे संरक्षण करण्याची गरज आहे.
ऐतिहासिक, प्राचीन पवनी नगरात आजही खोदकामात प्राचीन वस्तू मिळतात. अनेक शतकाच्या पुर्वी पवनी हे बौद्ध धर्माच्या प्रसाराचे केंद्र होते. सम्राट अशोकाच्या काळात पवनी नगराला फार महत्व होते. १९६७-७० मध्ये पुरातत्त्व विभाग व नागपूर विद्यापीठाने डॉ. मिराशी व डॉ. देव यांच्या मार्गदर्शनाखाली जगन्नाथ टेकडीच्या खाली केलेल्या खोदकामात भारतातील सर्वात मोठा प्राचीन बौद्धस्तुप आढळून आला आहे. या स्तुपाचे अवशेष आजही मुंबई, दिल्लीच्या वस्तुसंग्रहालयात ठेवले आहेत. सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा ही पवनी मार्गे बौद्धधर्माचा प्रसार करण्याकरिता दक्षिणेत गेल्याचा इतिहासात उल्लेख आढळतो.
इ.स. सातव्या शतकात गुप्त वंशाचे राज्य भारतात होते. त्यांची राजधानी पाटलीपुत्र होती. या गुप्तवंशात समुद्रगुप्त, चंद्रगुप्त, विक्रमादित्य आदी सम्राट होऊन गेले. त्यावेळेस विदर्भात वाकाटक राजाचे राज्य होते. वाकाटक पराक्रमी असल्यामुळे नाते संबंध जोडले होते. या वाकाटकांची राजधानी नंदिवर्धन आताचे नगरधन होती. या वाकाटकांनी पवनी तालुक्यावरही आपले राज्य विस्तारले होते.
वाकाटकाच्या काळात त्यांच्या साम्राज्याची ओळख व्हावी याकरिता गावागावात शिलाप्रकस्थ डालमेंट्स स्थापीत केले होते. हे शिलाप्रकस्थ वाकाटकच्या स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहेत. चुलीच्या आकाराचे तीन दगड ठेवून त्यावर एक मोठा भव्य सपाट दगड ठेवला आहे. या शिलाप्रकस्थांना स्थानिक लोक तेलगोटा म्हणतात. काही लोक त्यांची पूजाही करतात. हे शिलाप्रकस्थ खैरी तेलोता, पिंपळगाव येथे आहेत. पण अशाच प्रकारचे एक शिलाप्रकस्थ पवनी पासून ७ कि़मी. अंतरावरील पाहुनगाव जवळील जंगलातील भानसरा तलावाजवळ आहे. या जंगलाचा समावेश उमरेड-कºहांडला-पवनी अभयारण्यात करण्यात आल्यामुळे येथे जाण्याला बंद घालण्यात आली आहे.
हे डालमेंट्स खुल्या जागेत उन्हा, पाऊस, वादळ, वारा यांचा सामना करीत वाकाटक साम्राज्याची ओळख देत आजही उभे आहेत. पुरातत्व विभागाने या प्राचीन शिलाप्रकस्थांची ओळख व प्रसिद्धी करून दिल्यास तालुक्यात झपाट्याने वाढत असलेल्या पर्यटन क्षेत्रात अजून भर पडणार आहे व शिलाप्रकस्थ असलेले स्थळे पर्यटनस्थळाच्या यादीत यावयास वेळ लागणार नाही.
 

Web Title: Waxat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.