पवनी येथील दिवाण घाट नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 06:00 AM2020-02-23T06:00:00+5:302020-02-23T06:00:42+5:30

भोसलेकालीन दिवाण घाट शहराचे वैभव आहे. पवनी येथील नागरिक वैनगंगेवर स्नानासाठी याच घाटावर जात होते. चिरेबंदी दगडात बांधलेल्या या घाटाला बुरूज आणि बुलंद दरवाजा आहे. परंतु आता या घटाचे वैभव नष्ट होऊ पाहत आहे. चिरेबंदी दगड उखडले असून बुरूजही ढासळले आहेत. मोठा दरवाजा तर चिरे निखळल्याने बंद करावा लागला आहे.

On the way to the extinction of the Diwan Ghat at Pawani | पवनी येथील दिवाण घाट नामशेष होण्याच्या मार्गावर

पवनी येथील दिवाण घाट नामशेष होण्याच्या मार्गावर

Next
ठळक मुद्देऐतिहासिक स्थळ दुर्लक्षित । पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता, मात्र कायम दुर्लक्ष

अशोक पारधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पवनी शहरातील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित असून शहराचे वैभव असलेला दिवाण घाट आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पर्यटन विकासाकडे कुणाचेही लक्ष नसल्याने हा ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित आहे.
विदर्भासाठी पर्यटनाचे प्रमुख केंद्र होण्याची क्षमता पवनी नगरात आहे. पवन राजाची पवनी असा उल्लेख पौराणिक ग्रंथात असून सम्राट अशोकाचे वास्तव्य या पवनी नगरात होते. संपन्न ऐतिहासिक वारसा असलेल्या या शहरात पर्यटनस्थळांची मांदियाळी आहे. महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्प, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य. सिंदपुरी येथील आंतरराष्ट्रीय महासमाधीभूमी, विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक पंचमुखी गणेश, धरणीधर गणेश, रांजीतील गणपती यासह ऐतीहासिक परकोट, जवाहर गेट स्तूप या शहरात आहेत. वैनगंगा नदीच्या विशाल पात्राच्या तिरावर देखणे घाट आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता या सर्व स्थळांत आहे. परंतु इच्छाशक्तीअभावी दिवाण घाटासारखा ऐतिहासिक वारसा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
भोसलेकालीन दिवाण घाट शहराचे वैभव आहे. पवनी येथील नागरिक वैनगंगेवर स्नानासाठी याच घाटावर जात होते. चिरेबंदी दगडात बांधलेल्या या घाटाला बुरूज आणि बुलंद दरवाजा आहे. परंतु आता या घटाचे वैभव नष्ट होऊ पाहत आहे. चिरेबंदी दगड उखडले असून बुरूजही ढासळले आहेत. मोठा दरवाजा तर चिरे निखळल्याने बंद करावा लागला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही तर हा वारसा नामशेष होण्याची भीती आहे. शहरातील वैजेश्वर घाटाला महत्व दिले जाते. परंतु दिवाण घाटाकडे अद्यापही कुणाचे लक्ष गेले नाही.

पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न हवे
भारतीय पुरातत्व विभाग महाराष्ट्र पर्यटन विकास, नगरपालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या नामशेष होत असलेल्या घाटांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत नाही. पवनीतील नागरिकांना अजीबात फायदा नसलेल्या बाबींवर लक्षवेधी रुपये खर्च करण्यात धन्यता वाटते. परंतु पर्यटनाला चालना मिळेल असे ऐतिहासिक घाट दुर्लक्षित केले जात आहे. या घाटांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र सध्या दिवाण घाटाच्या सौंदर्यीकरणासाठी कोणत्याही उपाययोजना नाही.

Web Title: On the way to the extinction of the Diwan Ghat at Pawani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Fortगड