भूमिगत वीज वाहिनीचा प्रश्न लागणार मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:32 AM2021-01-21T04:32:06+5:302021-01-21T04:32:06+5:30
भंडारा-गोंदिया येथील भूमिगत वीज वाहिनीचा प्रश्न अनेक दिवसांपासून निधीअभावी प्रलंबित आहे. दोन्ही जिल्ह्यातील वीज वाहिन्यांचे नवीनीकरणाचे काम प्रलंबित आहे. ...
भंडारा-गोंदिया येथील भूमिगत वीज वाहिनीचा प्रश्न अनेक दिवसांपासून निधीअभावी प्रलंबित आहे. दोन्ही जिल्ह्यातील वीज वाहिन्यांचे नवीनीकरणाचे काम प्रलंबित आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात आयोजित बैठकीत गोंदिया-भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील विजेसंबंधित प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. शेतकऱ्यांना २४ तास वीज तसेच कृषी पंपाचे कनेक्शन आदी बाबींवर माहिती घेण्यात आली. दरम्यान सर्व प्रलंबित प्रश्न व प्रकल्प त्वरित मार्गी लावण्यात यावे असे निर्देश ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले. दोन्ही जिल्ह्यातील विजेसंबंधी प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्वरित निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासित केले. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, नियोजन विभागाचे अप्पर सचिव देवाशिष चक्रवर्ती, वित्त विभागाचे अप्पर सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे सचिव राजीव मित्तल, व्यवस्थापकीय संचालक महावितरण व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
.......
प्रलंबित वीज उपकेंद्रांची समस्या दूर होणार
भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील नवीन वीज उपकेंद्राचे प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होते. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. तर वेळीअवेळी वीज पुरवठा खंडित होत होता. आता उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने ही समस्या सुद्धा दूर होणार आहे.
.....
शहरातील रस्ते वीज खांबमुक्त होणार
शहरातील रस्त्यांलगत तर काही ठिकाणी वीज खांब लागले आहेत. त्यामुळे बरेचदा वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. शिवाय यामुळे अतिक्रमणाच्या समस्येत वाढ झाली होती. मात्र आता भूमिगत वीज वाहिनी टाकली जाणार असल्याने ही समस्या मार्गी लागणार आहे.
......
पहिल्या टप्प्यात १८० कोटी रुपये
भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामासाठी भंडारा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १८० काेटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे हा दोन्ही जिल्ह्यातील कामांना गती मिळणार आहे.