आम्ही लस घेतली, तुम्ही कधी घेणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:16 AM2021-05-04T04:16:27+5:302021-05-04T04:16:27+5:30
जिल्ह्यात महिला बचत गटांचे जाळे प्रत्येक गावात चांगले असून, कोरोना संकटात महिला बचत गटांनी विशेष योगदान देण्यासाठी महिला आर्थिक ...
जिल्ह्यात महिला बचत गटांचे जाळे प्रत्येक गावात चांगले असून, कोरोना संकटात महिला बचत गटांनी विशेष योगदान देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक महिला बचत गट तसेच महिला बचत गटांचे पदाधिकारी, लोकसंचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक यांनी स्वत: कोरोना लस घेत ग्रामीण भागात ४५ वर्षांवरील नागरिकांनाही लसीकरण करण्यासाठी विशेष जनजागृती माेहीम सुरू केली आहे. यात भंडारा येथील नवप्रभा सीएमआरसीच्या अध्यक्षा वीणा लाडे यांनी भंडारा रुग्णालयात कोव्हॅक्सिनची लस घेतली. तुमसर येथील सहयोगिनी अनुसया देशमुख यांनीही तुमसरातील रुग्णालयात कोरोनाची लस घेतली. लाखांदूर तालुक्यातील सोनी येथील करिश्मा उईके यांनी सोनी प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेतली. भंडारा तालुक्यातील डोडमाझरी येथील डोडमाझरी महिला बचत गटाच्या पदाधिकारी पुष्पा नरदंगे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेतली. भंडारा शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने कोरोनाची लस घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे. ही लस अत्यंत सुरक्षित असून, कुणालाही घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगून ग्रामीण भागात महिलांसाठी काम करणाऱ्या या महिलांनी सर्वांना लसीकरणाचे आवाहन केले आहे.