डबल मास्क घाला, कोरोना टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:57 AM2021-05-05T04:57:23+5:302021-05-05T04:57:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जीवनात शासनाने दिलेल्या त्रिसुत्रीचा वापर करणे अविभाज्य बनले आहे. यात मास्कचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जीवनात शासनाने दिलेल्या त्रिसुत्रीचा वापर करणे अविभाज्य बनले आहे. यात मास्कचा वापर ही सर्वात महत्त्वपूर्ण बाब समजली जात आहे. प्रशासन असो की तज्ज्ञ मंडळी सर्वच ‘मास्क इज मेडिसिन’ असे सांगत आहेत. विशेष म्हणजे आता ‘डबल मास्क घाला व कोरोनाला टाळा’ अशी जनजागृतीही केली जात आहे. तज्ज्ञांनीही या बाबीला पुरजोर पाठिंबा दिला आहे.
मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग व हात स्वच्छ धुणे या तीन गोष्टींचे पालन इमानेइतबारे केल्यास तुम्हाला कोरोनाची लागण होणार नाही. विशेष म्हणजे आता डबल मास्क घातल्यास नाक व तोंडाद्वारे संसर्गाचा प्रवेश होणार नाही. डबल मास्क हे ९५ टक्के अत्यंत सुरक्षित असल्याचेही तज्ज्ञ मंडळी सांगत आहेत. किंबहुना ही पद्धत बहुतांश नागरिकांनी अवलंबलीसुद्धा आहे. एन ९५ मास्क असो की साधारण कापडी मास्क, मात्र त्याचा वापर होणे अत्यंत गरजेचे आहे. घराबाहेर पडताना तोंडावर मास्क आहे किंवा नाही, याची जातीने शहानिशा करावी व तेव्हाच घराबाहेर पडावे. अनेकजण आजही मास्कचा वापर करत नाहीत. काही ठिकाणी ही बाब तुच्छ समजली जाते. मात्र, कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मास्कचे महत्त्व कळू लागले आहे. आता तर पोलिसांच्या भीतीमुळे का असेना प्रत्येकजण मास्क वापरु लागला आहे. मात्र, मास्क हे भीतीपोटी नव्हे तर स्वत:हून घालणे गरजेचे आहे. तेव्हाच कोरोनासारख्या महामारीला आपण आळा घालू शकतो, यात शंका नाही.
मास्क हाच पर्याय
मास्क इज मेडिसिन अशी संकल्पना आता रुजू झाली आहे. मास्कशिवाय आपल्याकडे आता पर्याय नाही, असा विचार करत औषध म्हणून मास्कचा वापर करायला हवा. शासन - प्रशासन नेहमीच याबाबतीत जनजागृती करत आले आहे. सर्जिकल किंवा एन ९५ मास्क घेण्याइतपत रक्कम नसली तरी घरगुती चार लेअरचे मास्क तयार करुन आपण ते वापरु शकतो. कोरोनापासून बचाव करण्याकरिता मास्क हा उपाय आहे.
मास्क कसा वापरावा
अनेकजण मास्क घालायचे म्हणून घालतात. मास्क घालण्याचीही योग्य पद्धत आहे. तोंड आणि नाक झाकले गेले पाहिजे, असा मास्कचा आकार हवा. जेणेकरुन संसर्गित कण किंवा विषाणू आपल्या शरिरात प्रवेश करता कामा नये. मास्क हा नाकावर आलेला असावा.
एन ९५ मास्क महागडे असल्याने अनेकजण ते घालत नाहीत. किंबहुना सर्जिकल मास्क घालण्याची सवय असल्यास ती अत्यंत चांगली बाब आहे. वारंवार मास्कला हात न लावता काढतानाही आपले हात स्वच्छ धुवावे व त्यानंतर मास्क काढून स्वत:ला सॅनिटाईज करणे आवश्यक आहे. कापडी मास्कही वापरता येतात. अनेकजण याचा उपयोगही करत आहेत. चार लेअरमध्ये निर्माण झालेले कापडी मास्क उपयोगासाठी योग्य आहेत. कुठलीही लाज न बाळगता या मास्कचा वापर हे आपल्याच शरीरस्वास्थ्यासाठी अत्यंत योग्य बाब आहे. वाॅशेबल मास्कचा वापर वाढल्याचेही दिसून येते.
मास्क भीतीपोटी नव्हे तर स्वत:हून घातले पाहिजेत. एन ९५ ते कापडी मास्क वापरणे चांगलेच आहे. सर्जिकल मास्क केव्हाही चांगलेच. दंडुकेशाहीमुळे आपण मास्क घालत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत सर्वांनी मास्क घालून तेच खरे औषध आहे, असे समजावे.
- डाॅ. नितीन तुरस्कर, अध्यक्ष, आयएमए, भंडारा.
लहान असो की मोठे घराबाहेर पडताना मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे. गरोदर महिलांनी कोरोनापासून बचाव करण्याकरिता मास्कचा वापर केला पाहिजे. घराबाहेर पडताना मुलांनीही याची काळजी घेतली पाहिजे.
- डाॅ.सीमा कावरे, गायनेकोलाॅजिस्ट, भंडारा.