अतांत्रिक व्यक्तीकडून हवामान केंद्राच्या नोंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 09:43 PM2018-10-16T21:43:08+5:302018-10-16T21:43:28+5:30
तालुक्यातील महालगाव बपेरा शिवारात असलेल्या पाटबंधारे विभागाच्या हवामान केंद्रातील नोंदी अतांत्रिक इसमाकडून घेतल्या जात आहेत. येथील यंत्र सामूग्री बेवारस असून लाखो रुपयांचे शासकीय निवासस्थाने रिकामे पडले आहेत.
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील महालगाव बपेरा शिवारात असलेल्या पाटबंधारे विभागाच्या हवामान केंद्रातील नोंदी अतांत्रिक इसमाकडून घेतल्या जात आहेत. येथील यंत्र सामूग्री बेवारस असून लाखो रुपयांचे शासकीय निवासस्थाने रिकामे पडले आहेत. विशेष म्हणजे संबंधित विभागातील कर्मचारी अधिकारी नागपूर येथे वास्तव्यास असल्याने हा प्रकार सुरु आहे. हवामान खात्याचा अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागत आहे. आता अतांत्रिक व्यक्ती हवामान केंद्रातील नोंदी घेत असल्याचे महालगाव बपेरा येथे उघडकीस आले. शासनाच्या पाटबंधारे विभागांतर्गत जलसंपदा उपविभाग क्रमांक ४ अंतर्गत महालगाव येथे हवामान केंद्राची उभारणी करण्यात आली. येथे स्वयंचलित व साधे पर्जन्यमापक, पवन वेगमापक, सूर्यप्रकाश तीव्रता मापक, कमाल व किमान तापमापक, दिशादर्शक उपकरण, बाष्पीभवन उपकरण बसविण्यात आले आहेत. संबंधित कर्मचाºयांसाठी निवासस्थानेही बांधण्यात आली. परंतु संबंधित विभागाचे कर्मचारी येथे राहत नाही. त्यामुळे हवामान केंद्र जंगलमय झाले आहे. दरदिवशी पर्जन्यमापनाची नोंद येथे घेतली जाते. परंतु येथील कर्मचारी नागपुरला वास्तव्यास असल्याने अतांत्रिक व्यक्तीकडून नोंद घेतली जात असल्याची माहिती आहे. तो किती शास्त्रशुद्ध पद्धतीने नोंद घेत असेल यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. राज्य शासनाने लाखो रुपये खर्च केलेली ही यंत्रणा आता धुळखात पडली आहे. केवळ कागदोपत्री सोपस्कार पार पाडले जातात. हवामानाचा अंदाज बेजबाबदारपणे घेण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. योग्य कारवाई झाली नाही तर कुलूप ठोकण्याचा इशारा युवक काँग्रेसचे नेते डॉ.पंकज कारेमोरे यांनी दिला.
येथील कर्मचाºयाचे पद रिक्त आहे. तेथील एका कर्मचाºयाकडे प्रभार दिला आहे. यापेक्षा जास्त काहीही सांगू शकत नाही.
- के.एम. डाकवाले,
जलसंपदा विभाग नागपूर