गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी
By admin | Published: September 3, 2015 12:28 AM2015-09-03T00:28:02+5:302015-09-03T00:28:02+5:30
गणरायाच्या आगमनासाठी आता जेमतेम १५ दिवसांचा अवधी उरला आहे.
भंडारा : गणरायाच्या आगमनासाठी आता जेमतेम १५ दिवसांचा अवधी उरला आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी शहरात जय्यत तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक मंडळांकडून मंडप उभारणीला सुरूवात झाल्याचे दिसत आहे. वेळेवर मूर्ती तयार व्हाव्यात यासाठी मूर्तीकार रात्रंदिवस एक करून कामाला लागले आहेत.
१७ सप्टेंबर रोजी गणरायाची स्थापना केली जाणार आहे. भंडारा जिल्ह्यातील गणेशोत्सवाची खास परंपरा आहे. शहरातील गणेशोत्सवाची जिल्ह्यात ख्याती आहे. शनिवारला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. त्यानंतर गणेश चतुर्थी आहे. दोन्ही सण जिल्ह्यात उत्साहात साजरे केले जातात. त्यामुळे मूर्तीकार गणपती मूर्र्तींसह श्रीकृष्णाच्या मूर्तीही तयार करण्यात व्यस्त आहेत. शहरातील सार्वजनिक मंडळांकडून गणेशोत्सव थाटामाटात साजरा केला जात असून मोजके दिवस उरल्याने मूर्तीकार मूर्ती बनविण्यात तर मंडळांची मंडप लावण्याची लगबग सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)