नववर्षाचे हर्षोल्लासात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 10:44 PM2018-01-01T22:44:15+5:302018-01-01T22:44:38+5:30
नववर्षाचे स्वागत अमरावतीकरांनी हर्षोल्लासात केले. नागरिकांनी संयम राखून जल्लोष केला.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : नववर्षाचे स्वागत अमरावतीकरांनी हर्षोल्लासात केले. नागरिकांनी संयम राखून जल्लोष केला. चौकाचौकांत पोलीस तैनात असल्यामुळे यंदाच्या नववर्षाला गालबोट लागले नाही, हे विशेष. पोलिसांनी ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून ते १ जानेवारीच्या पहाटेपर्यंत चोख बंदोबस्त ठेवल्यामुळेच हे शक्य झाल्याच्या प्रतिक्रिया अमरावतीकरांमध्ये उमटत होत्या.
२०१७ ला निरोप देण्यापूर्वीच्या १५ मिनिटापूर्वीच अमरावतीकरांनी फटाक्यांची आतषबाजी केली. दिवाळीच्या दिवशी ज्याप्रमाणे फटाक्यांची आतषबाजी होते, त्याचप्रमाणे नववर्षाच्या स्वागतावेळी अमरावतीत आतीषबाजी करण्यात आली. लॉन, हॉटेल, रेस्टांरट व खासगीस्थळावर जल्लोष करताना नागरिक आढळून आले. रात्री उशिरापर्यंत हॉटेल व रेस्टांरट सुरु असल्यामुळे नागरिकांच्या जल्लोष द्विगुणित झाला होता. सर्व दृष्टीने यंदा नववर्षाचे स्वागत उत्साहात पार पडले असून, अनुचित घटना घडली नाही.
नाकाबंदीदरम्यान पीएसआय गायब
पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांंनी नववर्षाच्या स्वागतावेळी शहरात ३५ ठिकाणी नाकाबंदी केली. पोलिसांनी २ हजार १४३ वाहनांची तपासणी करून १०६ वाहनचालकांवर कारवाई केली. या दरम्यान निंभोरा येथे काही जणांचा वाद झाल्याचा कॉल नियंत्रण कक्षाला मिळाला. त्यांनी ती माहिती नेमाणी गोडावून येथे तैनात असणाºया पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी सीपी मंडलिक यांनी पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिले. मात्र, नेमाणी गोडावूनवरील नाकाबंदीची जबाबदारी सांभाळणारे बडनेराचे पीएसआय अहिरे उपस्थित नसल्याचे सीपींना आढळून आले. त्यांनी तेथील पोलिसांशी संवाद साधून अहिरे यांना बोलाविण्यास सांगितले.
नववर्षात एकही अनुचित घटना घडली नाही, याचे श्रेय पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना जाते. मीडियानेही वृत्तातून जनजागृती केल्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत मिळाली.
- दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त.