कोरोनातही बँकांमधील वाढत्या गर्दीचे करायचे तरी काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:37 AM2021-05-06T04:37:17+5:302021-05-06T04:37:17+5:30

भंडारा : सध्या राज्यात संचारबंदी लागू असल्याने अती आवश्यक सेवा फक्त सुरू ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, जिल्ह्यात वाढलेला कोरोना ...

What to do with the growing congestion in the banks in Corona too? | कोरोनातही बँकांमधील वाढत्या गर्दीचे करायचे तरी काय?

कोरोनातही बँकांमधील वाढत्या गर्दीचे करायचे तरी काय?

Next

भंडारा : सध्या राज्यात संचारबंदी लागू असल्याने अती आवश्यक सेवा फक्त सुरू ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, जिल्ह्यात वाढलेला कोरोना संसर्गाचा वेग आणि दवाखान्याच्या कारणांमुळे पैशाचा व्यवहार करण्यासाठी बँकांसमोर रांगा लागत आहेत. अनेक ठिकाणी वेळेत तसेच एटीएममधून पैसे निघत नसल्याने ग्राहकांना बँकेतच रांगा लावून पैसे काढावे लागत असल्याचे चित्र भंडारा शहरात दिसून येत आहे. त्यामुळे गर्दी होत आहे, तर दुसरीकडे सुरक्षा रक्षकांसोबत अनेकदा ग्राहकांची अरेरावी होत आहे. बहुतांश ठिकाणी ग्राहक आणि बँक कर्मचाऱ्यांमध्येही भांडणे होताना दिसून येत आहे.

सध्या जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे मेडिकल, दवाखाने वगळता बाकी अन्य दुकाने बंद आहेत. लोकांना दवाखान्यासाठी पैशांची गरज भासत आहे. त्यामुळे बँका सुरू आहेत. बँकांमधील पैसे काढण्यासाठी लोक सकाळी दहा वाजल्यापासूनच बँकेसमोर रांगा करीत आहेत, तर दुसरीकडे ग्रामीण भागात शेतकरी पीक कर्जासाठी तसेच गतवर्षीचे पीक कर्ज भरण्यासाठी तसेच नुकसान भरपाईचे मिळालेले पैसे, श्रावण बाळ, वृद्ध, निराधार योजनेचे पैसे काढण्यासाठी बँकांसमोर रांगा दिसून येत आहेत. त्यामुळे अनेक बँकांनी सुरक्षा रक्षकासह पाण्याचीही व्यवस्था केली आहे. मात्र, बहुतांश बँकेसमोर हे चित्र दिसत नाही. बँक कर्मचाऱ्यांकडूनही अनेकदा उद्धटपणाची वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी कोंढा कोसरा येथील सहकारी बँकेत आलेल्या ग्राहकांनी केल्या. बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय योजना राबविण्याची गरज आहे.

बॉक्स

बँक अधिकारी, कर्मचारी कोरोना लसीपासून वंचितच

एकीकडे बँका अत्यावश्यक सेवेसाठी सुरू ठेवण्यात आल्या आहेत, तर दुसरीकडे बँकांमध्ये अतोनात होणारी गर्दी लक्षात घेऊन अनेक बँक कर्मचाऱ्यांना आजही कोरोनाची लस मिळालेली नाही. त्यामुळे अनेक बँक कर्मचार्‍यांनाही कोरोनाची लागण झाली असून, जिल्हा प्रशासनाने बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्याची मागणी होत आहे. तसेच शासनाने बँक कर्मचार्‍यांनाही विमा लागू करावा, अशी मागणी आहे.

कोट

ग्राहकांच्या प्रतिक्रिया

माझं वय साठ आहे. मी पैसे काढण्यासाठी बँकेत आलो आहे. मला पेन्शन लागू आहे. मात्र, बँकेत सकाळीच आलो तरी अजून पैसे मिळाले नाहीत. येथे गर्दी आहे. त्यात बँकवाल्यांनी ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्याची गरज आहे. छोट्या-मोठ्या कामासाठी बँकवाले जरा दमवतात. बाबूराव गिरीपुंजे, ग्राहक.

कोट २

मी माझ्या कुटुंबाच्या दवाखान्यासाठी पैसे काढण्यासाठी आलो आहे. भंडारा येथील बँक ऑफ इंडियाच्या मेन शाखेत माझे काम आहे. मात्र, येथील बँक अधिकारी, कर्मचारी उद्धटपणाची वागणूक देतात. प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करायला हवी.

दिनेश वासनिक, भंडारा

कोट

माझे भंडारा येथील बँक ऑफ इंडियाच्या मेन शाखेत खाते आहे. माझ्या बँक खात्यातून पैसे कमी झाल्यावर वर्षभर हेलपाटे मारले. परंतु, अजून पैसे मिळाले नाहीत. या विरोधात नागपूरला आरबीआयकडे तक्रार दिली आहे. बँक अधिकारी, कर्मचारी निष्क्रिय असल्याचे मला चांगला अनुभव आला आहे.

रेणुका दराडे, भंडारा.

कोट

सध्या शासकीय योजनेचे पैसेही अनेकांच्या खात्यात जमा होत आहेत. विविध कामांसाठी पैसे काढण्यासाठी लोक बँकेत येतात. अनेक ठिकाणी एटीएम असल्याने बँकेत येण्याची आवश्यकता नाही. तसेच बँकेचे व्यवहार हे प्रत्यक्ष खातेदार असल्याशिवाय करता येत नाहीत. कोरोनात सर्वांनी काळजी घेऊन शासन नियमांचे पालन करावे.

बँक व्यवस्थापक, भंडारा

कोट

आरबीआय निर्देशानुसार बँक सकाळी १० ते १२ या वेळेत नियमित सुरू असते. शहरातील महत्त्वाच्या चौकात आमच्या बँकेची शाखा असल्याने येथे नेहमीच लोकांची वर्दळ असते. मात्र, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सूचना देऊन येणाऱ्या नागरिकांनाही गर्दी न करण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच पाणी व इतर सुविधाही ठेवण्यात आल्या आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्र, व्यवस्थापक, भंडारा.

Web Title: What to do with the growing congestion in the banks in Corona too?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.