काय वाट्टेल ते! मुलापेक्षा आईचे वय पाचच महिन्याने अधिक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 10:33 AM2020-08-03T10:33:51+5:302020-08-03T12:21:22+5:30
श्रावण बाळ निवृत्ती योजनेचा लाभ उचलण्यासाठी एकाच परिवारातील तीन सदस्यांनी जन्मतारखेत फेर बदल करून हा प्रताप घडवून आणला आहे.
सिराज शेख।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शीर्षक वाचून दचकलात ना ! हे कसे शक्य आहे म्हणून विश्वास बसणार नाही. आपल्या मुलापेक्षा आई कमीतकमी २० वर्षे तर वडील २१ वर्षे तरी मोठे राहणारच. पण आजच्या युगात असेही होऊ शकते हे एका प्रकरणावरून लक्षात आले आहे. आईच्या आणि त्यांच्या मुलाच्या जन्म तारखेत फक्त पाच महिन्याचा अंतर आहे. श्रावण बाळ निवृत्ती योजनेचा लाभ उचलण्यासाठी एकाच परिवारातील तीन सदस्यांनी जन्मतारखेत फेर बदल करून हा प्रताप घडवून आणला आहे.
सदर प्रतिनिधीने हे प्रकरण हुडकून काढले असता आणि त्यांचे कागदपत्रे अधिकाऱ्यांनी बघितली असता त्यांचेही डोके चक्रावले. पैशासाठी लोक कोणत्या थराला जातील याचा आज नेम नाही.
श्रावण बाळ वृद्धापकाळ निराधार योजनेचा हजार रुपये महिना प्राप्त करण्यासाठी ३५ ते ४५ वर्षाचे नागरिक आधार कार्डातील मूळ जन्मतारखेत फेरबदल करून तसेच तलाठी अहवाल व वैद्यकीय प्रमाणपत्र बोगस तयार करून याचा लाभ उचलत आहेत. मोहाडी तालुक्यात असे हजारो प्रकरणे आहेत ज्यात पती-पत्नी दोघांनाही लाभ मिळत आहे. परंतु ताडगाव येथील एका परिवाराने तर कहरच केला. त्यांनी पती-पत्नी दोघांचे तर अर्ज सादर केलेच केले परंतु आपल्या मुलाचाही अर्ज सादर केला.
जर मुलगा ६७ वर्षाचा आहे, तर आई-वडील जवळपास ९२ वर्षाचे असायला हवे होते, परंतु अर्ज करणारे दोघेही ही ५०-५५ वर्षाच्या जवळपास आहेत. शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी लोक काहीही करण्यास तयार असतात. मागील पाच वर्षाच्या कालावधीत या प्रकारचे हजारो बोगस प्रकरणे मंजूर करण्यात आली असल्याचे खात्रीलायक वृत्त असून ३० वर्षा पासून ते ४५ वर्षापर्यंतचे असलेले आपण ६६ वर्षाचे असल्याचे भासवून योजनेचा लाभ घेत आहेत.
बनावटी आधार कार्ड
अर्जातील आधार कार्डनुसार पतीची जन्मतारीख २५ जून १९५४, पत्नीची जन्मतारीख एक जानेवारी १९५३, तर मुलाची जन्मतारीख ११ जून १९५३ आहे. या जन्म तारखेप्रमाणे आई ६७ वर्षाची, वडील ६६ वर्षाचे, तर मुलगा ६७ वर्षाचा आहे. म्हणजे पत्नीपेक्षा पती एक वर्षाने लहान तर मुलगा बाप पेक्षा एक वर्षाने मोठा आणि आईपेक्षा फक्त पाच महिन्याने लहान आहे. आधार कार्डातील मूळ जन्मतारखेत फेरबदल करून खोटी जन्मतारीख घालतांना त्यांना एवढेही भान राहिले नाही की आई-वडील व मुलाच्या जन्मतारखेत काहीतरी अंतर ठेवायला हवे. यातच ते फसले. तेथीलच एका राशन दुकानदाराने सुद्धा आपण व पत्नी निराधार असल्याचा अर्ज केला आहे. बोगस आधार कार्ड, वैद्यकीय दाखले, तलाठी अहवाल बनविणारी टोळी तालुक्यात सक्रीय असल्याची माहिती आहे.