माझ्या मुलीचा काय दोष होता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:27 AM2021-01-10T04:27:24+5:302021-01-10T04:27:24+5:30
मोहाडी : नऊ दिवसांपूर्वीच तिला जन्म दिला. दिसायला अत्यंत सुंदर. माझा जीव की प्राण होती. अशक्त असल्याने तिला एसएनसीयू ...
मोहाडी : नऊ दिवसांपूर्वीच तिला जन्म दिला. दिसायला अत्यंत सुंदर. माझा जीव की प्राण होती. अशक्त असल्याने तिला एसएनसीयू कक्षात दाखल केले होते. मात्र ती मला अशी पुन्हा परत मिळेल मी स्वप्नातही विचार करू शकत नाही. नऊ दिवसाच्या मुलीचा काय दोष होता, असे बोलत तिने आपल्या आसवांना वाट मोकळी करून दिली. दुर्गा विशाल रहांगडाले राहणार टाकला ता. मोहाडी असे मातेचे नाव आहे. शनिवारी पहाटे लागलेल्या आगीत दुर्गा हिची नऊ दिवसाची कन्याही होरपळून ठार झाली. जिल्हा रुग्णालयात सगळे व्यवस्थित होते. तिथे चांगली आरोग्य सुविधा आहे, असा विश्वास आम्हाला होता. मात्र आजच्या घडलेल्या घटनेने आमच्या सोनेरी आयुष्याचे स्वप्न भंगले आहे, असे मत दुर्गाचे पती विशाल रहांगडाले यांनी व्यक्त केले. शासनाने आता तरी आम्हाला मदत करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे गेलेला जीव परत येणार नाही, परंतु दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. दरम्यान शनिवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास नवजात बाळाचे पार्थिव आणण्यात आले. शोकाकुल वातावरणात तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.