तर कसा होणार उदयोन्मुख खेळाडूंचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:22 PM2017-08-28T23:22:06+5:302017-08-28T23:22:37+5:30
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या क्रीडा संकुलाची अवस्था पाहण्यासारखी आहे.
इंद्रपाल कटकवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या क्रीडा संकुलाची अवस्था पाहण्यासारखी आहे. क्रीडांगण अथवा मैदान आहे पण सुविधा नाही, अशी वस्तुस्थिती आहे. खेडाळूंचा विकासापेक्षा अधिकाºयांचाच विकास झाला काय? असे स्पष्ट क्रीडापटू व क्रीडाप्रेमी बोलु लागले आहेत. राष्टÑीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेली ही क्रीडागंणाची व्यथा. सदर क्रीडा संकुल नावापुरते असून क्रीडा सुविधांचा येथे प्रचंड वाणवा आहे. निधीची बोंब कायम असल्याने विकास कसा करावा असा युक्तीवाद क्रीडा अधिकारी नेहमी करतात. राज्य शासनानेही क्रीडा संकुलाच्या विकासाबाबत गांभीर्य दाखविले नाही
मैदानात चिखलच चिखल
क्रीडांगण कसे असावे असा कुणी प्रश्न विचारल्यास तर ते भंडारा येथील क्रीडा संकुलासारखे निश्चितच नसावे, असा सल्ला दिला जाईल. सध्या स्थितीत या क्रीडांगणात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले असून पावसामुळे चिखल निर्माण झाला आहे. धावपट्टीवर पाणी साचून राहत असल्याने बांधणी व दर्जा कसा असावा असा प्रश्न आपसूकच निर्माण होतो. धावपट्टीच्या बाजुला असलेल्या नालीवरील लोखंडी आच्छादन तुटलेले असून नालीमध्ये झाडीझुडपी वाढली आहेत. क्रीडांगणातील स्वच्छता करायलाही जिल्हा क्रीडा कार्यालयाला निधी उपलब्ध होत नसावा काय? असा प्राथमिक सवाल क्रीडांगणाची स्थिती बघीतल्यावर उपस्थित होतो.
जिल्हा क्रीडा पुरस्काराला दांडी
खेळाडूंना शिकविण्यासोबतच त्यांच्यातील उपजत गुणांना वाव देण्याची शिकवण प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक देत असतो. अश्या मार्गदर्शक किंवा प्रशिक्षकांना दरवर्षी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार देवून त्यांना प्रोत्साहीत करण्यात येते. सन २०१६-१७ अंतर्गत देण्यात येणाºया क्रीडा पुरस्काराला यावर्षी जिल्हा प्रशासनातर्फे दांडी मारण्यात आली. सदर पुरस्कार २६ जानेवारी, १ मे किंवा १५ आॅगस्ट रोजी देण्यात येते. परंतु यावर्षी या पुरस्काराचे वाटप झाले नाही.
खेळाडूंचा विकास जेवढा त्यांच्या आत्मशक्तीवर अवलंबून आहे. तेवढीच आवश्यकता मुलभूत क्रीडा सुविधांचीही आहे. निधीचा तुटवडा कायम असल्याने व राजकीय अनास्था असल्याने खेळाडूंचा विकास होत नाही. हीच या जिल्ह्यातील खेळाडूंची शोकांतिका आहे. याकडे क्रीडा विभागासह लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.
- प्रविण कळंबे,
फुटबॉल प्रशिक्षक, भंडारा